छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयएमए हॉलमध्ये भाजपची मराठवाडा विभागीय बैठक आज, २७ जुलैला पार पडली. या वेळी मराठवाड्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यात पुन्हा आपलेच सरकार येणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगण्यात आले.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार मेघना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी बैठकीला बोलाविण्यात आले होते. विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनात्मक आढावा यावेळी घेण्यात आला.
प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, राजेंद्र साबळे, लक्ष्मण थेटे यांच्यासह चारही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी बैठकीला हजर होते. महायुतीत भाजपच मोठा भाऊ असल्याने गेल्यावेळपेक्षा यावेळी जास्त जागा भाजपकडे घेण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. त्यावेळी जास्तीत जास्त जागा अापण घेऊ आणि जिंकूही. तुम्ही मरगळ झटकून कामाला लागा, असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.