छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी ओबीसींतून आरक्षणासाठी हट्ट धरल्यानंतर ओबीसी नेत्यांनीही तीव्र विरोध सुरू केला… याचे पडसाद मात्र गावागावात उमटत आहेत. आरक्षणावरून पेटलेला वाद माणुसकीही संपवत चालला असल्याचे चिंताजनक, विदारक अन् कुणाचाही संताप होईल असे दुर्दैवी चित्र खुलताबाद तालुक्यातील भडजी येथे समोर आले. सुतार समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी पार्थिव स्मशानभूमीत आणले असता, गावातील दोन माथेफिरू विकृतांनी आमच्या समाजाची स्मशानभूमी असल्याचे म्हणत तीव्र विरोध केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. गावातील प्रतिष्ठितांनी सामंजस्याने हा वाद सोडवत त्या विकृतांचे कान उपटले. त्यानंतर अंत्यविधी झाले. मात्र ३ तास यामुळे पार्थिव तसेच पडून होते.

नक्की झाले काय?
भडजी येथील सुतार समाजातील बाबुराव यादवराव आंबे यांचे २१ जुलैला निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी नातेवाइक, पाहुणे मंडळी जमली. पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीत आणण्यात आले. त्याचवेळी दोघा माथेफिरूंनी विरोध सुरू केला. तुमच्या समाजाचे अंत्यसंस्कार या ठिकाणी करायचे नाहीत, असे म्हणत त्यांनी टोकाचा विरोध सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. मृतकाच्या नातेवाइकांनी खुलताबाद पोलिसांना कॉल केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पार्थिव तसेच पडून होते. ही बाब गावात कळताच काही प्रतिष्ठितांनी, सरपंचांनी मध्यस्थी करून माथेफिरूंचे कान उपटले. कायद्याची माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्षाने वाद सोडविण्यासाठी कुठलेही प्रयत्न न करता काढता पाय घेतल्याचे चित्र दिसून आले.

सुतार समाजाला टार्गेट करणे दुर्दैवी…, मराठा समाजातील भावना
स्थानिक मराठा समाजाच्या प्रतिष्ठितांनी माथेफिरूंच्या या कृत्यावर तीव्र आक्षेप घेतला. कुणाच्या अध्यात मध्यात नसलेला, कायम मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या सुतार समाजाबद्दल माथेफिरूंनी आकसबुद्धी केलेल्या या कृत्याचा त्यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. ओबीसी आहे म्हणून सुतार समाजातील अंत्यविधी रोखण्याबद्दल सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. या माथेफिरूंविरुद्ध कडक कारवाई व्हावी, जेणेकरून पुन्हा असे कृत्य कुणी करू नये, अशी मागणीही गावातून होत आहे. दरम्यान, या घटनेबाबत सरपंच बाबासाहेब वाकळे म्हणाले, की काही लोकांचा गैरसमज झाला होता. त्यांना आम्ही समजावले. त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले. यापुढे असा प्रकार गावात घडणार नाही.
पोलिसांनी कडक कारवाई करावी…
दरम्यान, असंवेदनशीलतेचे दर्शन घडवत माथेफिरू दोघा-तिघांनी अंत्यविधीला विरोध केला. फुले उचला, इथे जाळू नका, असे शिवीगाळ करत ते म्हणत होते. असा प्रकार अत्यंत गंभीर असून या माथेफिरूंबद्दल पोलिसांनी कोणतेच पाऊल न उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सामाजिक शांतता भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारने या घटनेची दखल घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, ही स्मशानभूमी कुणाची वैयक्तीक मालमत्ता नाही. आ. सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून (म्हणजेच सरकारी पैशातून) बांधली गेली आहे. तरीही माथेफिरूंनी आरक्षण आंदोलनाचा संताप गरीब समाजावर काढल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.