छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवशंकर कॉलनीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना रविवारी (११ मे) समोर आली. जवाहरनगर पोलिसांत पित्याने धाव घेऊन तक्रार दिली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.
शिवशंकर कॉलनीतील ४७ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते, त्यांची पत्नी आणि १७ वर्षीय मुलगी राहतात. खासगी कंपनीत काम करून उदरनिर्वाह करतात. मुलगी दहावीच्या शिक्षणासाठी अकोला येथे तिच्या आत्याकडे राहत होती. १५ दिवसांपासून शिवशंकर कॉलनीत घरी आली. शनिवारी (१० मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास मुलगी घरात कोणाला काहीएक न सांगता तिच्या कपड्याची बॅग, कादगपत्रे घेऊन कोठेतरी निघून गेली. तिचा आजूबाजूला व इतर ठिकाणी, नातेवाईकांत, तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली. मात्र ती मिळून आली नाही. तिला कोणीतरी फूस लावून पळवल्याचे तक्रारीत पित्याने म्हटले आहे. जाताना निळा टॉप आणि बदामी रंगाची लेगिन्स घालून गेली असून, कपड्याच्या दोन बॅग भरून गेली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार जावेद पठाण करत आहेत.