छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवळाई चौकातील मदरशातून २ मुलांचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस ठाण्यात शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणकर्त्याविरुद्ध रविवारी (११ मे) गुन्हा दाखल केला आहे. मुलांच्या मामावर संशय असून, त्यानेच टोस्ट, बिस्कीट घेऊन देतो, असे सांगून मोटारसायकलीवर बसवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अपहरण झालेल्या एका मुलाचे वय ९ आणि दुसऱ्याचे १० आहे. एक जटवाडा रोड सईदा कॉलनीतील असून, दुसऱ्या देवळाई रोड कौसर पार्कचा रहिवासी आहे. ६ मे रोजी सकाळी साडेआठला शिक्षकांनी मुलांची हजेरी घेतली असता दोन मुले गैरहजर होते. शिक्षकांनी अपहरण झालेल्या एका मुलाच्या मोठ्या भावाला विचारले असता त्याने सांगितले, की सकाळी सातला आमचे मामा अनिस खान खलील खान ऊर्फ बाबा (रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर) हा मदरसामध्ये आला. त्याने दोघांना टोस्ट, बिस्कीट घेऊन देतो, असे म्हणून मोटारसायकलीवर बसवून नेले.
सर्वांनी दुपारपर्यंत दोन्ही मुले परतण्याची वाट पाहिली. पण ते आलेच नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी मुलांच्या वडिलांना कळवले असता त्यांनी सांगितले, की तुम्ही काही काळजी करू नका. तो संध्याकाळपर्यंत दोन्ही मुलांना घेऊन मदरशात येईल. मात्र अनिस खान मुलांना घेऊन आला नाही. त्यामुळे दोन्ही मुलांचा सर्वांनी मिळून आजूबाजूच्या परिसरात, मित्राकडे, नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र दोघेही मिळून आले नाहीत. अखेर अनिस खानने दोन्ही मुलांना अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. अधिक तपास पोलीस अंमलदार तुकाराम सोनुने करत आहेत.