छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १९ वर्षीय विवाहितेला न्यू हनुमाननगरातून पतीच्या घरून पळवून नेत तरुणाने पाचोरा,ठाणे येथील लॉजवर बलात्कार केला. त्यानंतर कल्याणच्या कोनगावमध्ये खोली भाड्याने घेऊन दोघे पती-पत्नी म्हणून राहत होते. तिथे त्याने तिच्यावर महिनाभर बलात्कार केला. पतीने पत्नी हरवल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात केल्याने पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. दोघे कल्याणमध्ये असल्याचे कळताच पोलिसांनी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर विवाहितेने प्रियकर तरुणाविरुद्ध शुक्रवारी (१९ जुलै) तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीपक संतोष दांडगे (रा. जळकी बाजार, ता. सिल्लोड) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे.
अशी सुरू झाली ब्लॅकमेलिंग…
सायली (नाव बदलले आहे) लग्नाआधी आई-वडिलांकडे राहत असताना आठवीत शिकत असताना घराशेजारी राहणाऱ्या दीपकने तिच्यासोबत ओळख निर्माण केली. आईच्या मोबाइलवरून सायली त्याच्याशी बोलत होती. बारावी झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी स्थळ पाहणे सुरू केले. ही गोष्ट दीपकला कळल्याने त्याने सायलीला आपण पळून जाऊ, असे सांगितले. त्यावर सायलीने त्याला समजावून सांगितले होते, की आपण एका भावकीतील आहोत. आपले लग्न होऊ शकत नाही… त्यानंतर तिच्या वडिलांनी स्थळ पाहिले. सोयरीक झाली. त्यानंतर साखरपुडा झाला. साखरपुड्यात पतीने तिला मोबाईल गिफ्ट दिला. त्यात जिओचे सीमही स्वतःच्या नावावर घेऊन दिलेले होते.
लग्नानंतर २७ सप्टेंबर २०२३ रोजी दीपकने तिचा नंबर मिळवून संपर्क केला व इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिला मेसेज करू लागला. तो गावातील असल्याने सायलीने त्याला मेसेज केले व फोनवर बोलू लागली. त्यानंतर दीपक तिला वारंवार फोन करून तू माझ्यासोबत बोल, अन्यथा तुझे-माझे मेसेज व्हायरल करेल, असे सांगून धमक्या देऊन बोलत असे. तू माझ्यासोबत चल. आपण निघून जाऊ. तिकडे कुठे राहून संसार करू, असे म्हणू लागला. सायलीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नव्हता. वडिलांची बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे तो पतीस, वडिलांना बदनाम करेल, जिवाचे बरेवाईट करेल या भीतीने सायली सहन करत राहिली.
जबरदस्ती पळवून नेत बलात्कार…
१५ जून २०२४ रोजी सायली ही पती व चार पुतण्यांसोबत न्यू हनुमाननगरात किरायाने राहायला आल्यानंतर दीपक तिला वारंवार फोन करून दोघांचे मोबाइलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन सोबत पळून चल, असे म्हणून त्रास देऊ लागला. त्यामुळे सायली घाबरून गेली. २५ जून २०२४ रोजी दीपक सायली राहत असलेल्या हनुमानगरात आला. तिच्या घराखाली येऊन थांबवला व म्हणाला, की तू बाहेर ये. नाहीतर मी तुझ्या घरात येतो. त्याने खाली बोलावून घेतले.
गाडीवर बस, नाहीतर गल्लीत तमाशा करतो, असे म्हणून तिला धमकावले. त्यामुळे घाबरून सायली त्याच्या मोटारसायकलीवर बसली. तिथून दोघे मोटारसायकलीने पाचोरा (जि. जळगाव) येथे गेले. सायलीचा मोबाइल घरी राहिल्याने ती कोणाला कॉल करू शकत नव्हती. पाचोरा येथे दीपक तिला घेऊन एका लॉजवर गेला. तेथे खोली घेऊन दोघांनी मुक्काम केला. मुक्कामादरम्यान त्याने सायलीसोबत तिच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध ठेवले. धमकी दिली की, तू आता माझ्यासोबतच रहा नसता तुझी व तुझ्या बापाची गावात बदनामी होईल.
ठाण्याला नेले, तिथेही तिच्या शरीराचे तोडले लचके…
दुसऱ्या दिवशी २६ जून २०२४ रोजी दीपकने त्याची मोटारसायकल तिथेच सोडून त्याच्या मित्राला सांगून ओमनी कार पाचोरा येथे बोलावून घेतली. त्यात बसून दोघे वडोदरा येथे दुसऱ्या दिवशी २७ जूनला पोहोचले. तिथे त्याने तिला दिवसभर फिरविले. नंतर त्याच दिवशी रात्री १० ला ट्रॅव्हल्स बसमध्ये बसवून दीपकने तिला ठाणे येथे आणले. ठाण्यात २८ जूनला सकाळी साडेसहाला ते पोहोचले. तिथे दीपक तिला एका लॉजवर घेऊन गेला. दोन दिवस तिला लॉजवर ठेवून धमक्या देऊन त्याने तिच्या इच्छेविरुध्द वारंवार बलात्कार केला. दोन दिवस लॉजवर राहिल्यानंतर दीपकने कोनगाव (कल्याण, ठाणे) या गावात एक रूम केली, तेथील घरमालकास त्याने आमचे लव्ह मॅरेज झाले आहे, असे खोटे सांगितले. त्या रुमवर सायलीला ठेवून ३ जुलैला तिच्याइच्छेविरुध्द धमक्या देत वारंवार बलात्कार केले.
…अन् पोलीस धडकले!
इकडे सायली गायब झाल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात २५ जूनला तिच्या पतीने दाखल केली होती. त्यामुळे पोलीस तिचा शोध घेत होते. तपास करत करत पोलीस ४ जुलैला थेट कोनगावला धडकले. तिथून दोघांना ताब्यात घेतले. दोघांना छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आले. त्यानंतर सायलीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (१९ जुलै) दीपकविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी दीपकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे करत आहेत.