छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विवाहित हिंदू तरुणीला जाळ्यात अडकवून तिच्या वडिलांच्या घरातून मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धामणगाव (ता. फुलंब्री) येथे समोर आली आहे. तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणात फुलंब्री पोलिसांत तक्रार दिली असून, त्यावरून पोलिसांनी तरुणी व मुस्लिम तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण लव्ह जिहादचे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, तरुणीने घरातून जाताना दागिने व रोख ९० हजार रुपये नेले आहेत.
मजहर मुसा पठाण असे हिंदू तरुणीला फूस लावून पळवून नेणाऱ्याचे नाव आहे. तो धामणगावचा आहे. विवाहित तरुणीचे वडील धामणगावमध्येच राहतात. तरुणी पतीच्या घरून धाणमगावला माहेरी आली होती. तिने घरातील २५ हजार रुपयांचे दागिने व रोख ९० हजार रुपयांचा डल्ला मारला. त्यानंतर मजहरचा हात धरून पळून गेली. मजहरनेच तिला हे कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला आहे.
तरुणीचे वडील मजुरी करतात. ते एका मोठ्या समाजातील येतात. त्यामुळे गावच नव्हे तर फुलंब्री तालुक्यात खळबळ उडाली असून, या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात संतप्त पित्याने मुलीबद्दलही कडक भूमिका घेतली असून, तिच्यासह मजहरविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी तरुणी आणि मजहर अशा दोघांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.