छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील आझाद चौकात गुरुवारी (२० मार्च) पहाटे ५:२० वाजता अग्नितांडव झाले. विजेच्या तारांतील शॉर्टसर्किटमुळे आधी एका फर्निचरच्या दुकानाला आग लागली, नंतर ही आग वाढत जाऊन तब्बल १८ दुकानांची राखरांगोळी केली. एका इमारतीचे मोठे नुकसानही केले. लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या नऊ गाड्यांनी पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाजेद जहागीरदार यांच्या मालकीची १७ दुकाने भाड्याने दिलेली असून, यातील बहुतांश दुकाने लाकडी फर्निचर साहित्याची आहेत. पहाटे ५:२० वाजता परिसरातील कब्रस्थानातील विजेच्या डीपीमध्ये स्पार्किंग झाली. त्यामुळे परिसरातून गेलेल्या तारा एकमेकांना चिकटल्या. त्यातून आगीच्या ठिणग्या कलीम भाई यांच्या फर्निचरच्या दुकानावर पडल्या व आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. पहाटे ५:३८ वाजता सिडको अग्निशमन विभागाचा पहिला बंद घटनास्थळी पोहोचला. मात्र, आग मोठी असल्याने परिस्थिती आटोक्याबाहेर गेली. आगीने छोट्या-मोठ्या १८ दुकानांना घेरले होते. त्यानंतर पदमपुरा, चिकलठाणा, नक्षत्रवाडी आणि एन-९ परिसरातील महापालिकेचे अग्निशमन बंब, एमआयडीसीचे २, शेंद्रातील १ आणि गरवारे कंपनीचा एक बंब असे एकूण ९ बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग सकाळी १०:३५ मिनिटांनी विझविण्यात यश आले. अग्निशमन विभागाच्या मदतीला जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक धावून आले होते. आगीत १८ दुकानांचे तब्बल ४४ ते ५० लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा दावा संबंधितांनी केला आहे. दुकानांच्या मागे असलेल्या दोन घरांचे एसी, पाण्याच्या टाक्या आणि दरवाजा असे एकूण १ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, महावितरणने घटनास्थळी पाहणी केली. उद्योग, कामगार, ऊर्जा विभागाचे विद्युत निरीक्षक आज, २१ मार्चला घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते घटनेसंदर्भातील अभिप्राय देतील. आग इतकी भीषण होती, की २ किमी परिसरात धूर पसरला होता.
ही दुकाने भस्मसात…
इम्तियाज अहमद यांचे रॉयल स्टील, अयुब खान यांचे अलमास फर्निचर, कलीम शेख यांचे औरंगाबाद फर्निचर, अजमत खान यांचे अरमान फर्निचर, सय्यद अलताफ यांचे शोएब फर्निचर, शेख सिराज यांचे दानीश फर्निचर, अफसर पठाण यांचे मोईन फर्निचर, सरदार भाई यांचे ए. के. फर्निचर, वारीस देशमुख यांचे देशमुख फर्निचर, राजीक शेख यांचे अफाम फर्निचर, अतीक अहमद यांचे हायफाय फर्निचर, सय्यद शकीर यांचे नवक्फल फर्निचर, सलमान खान यांचे रेहान फर्निचर, वसीम खाने यांचे राज फर्निचर, सय्यद माजीद यांचे रॉयल फर्निचर, मुन्वर खान यांचे मुन्वर के. सागर ट्रेडिंग कं. आणि इस्माइल शाह यांचे वॉशिंग कार सेंटर जळून खाक झाले आहे.