खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद नगरपरिषदेचा लाचखोर वरिष्ठ लिपिक जितेंद्र रामनाथ बोचरे (वय ३९) हा अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. ५ हजार रुपयांची लाच घेताना त्याला खुलताबाद नगरपरिषदेत बुधवारी (१९ मार्च) पकडण्यात आले.
एसीबीकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या मामाची खुलताबाद नगरपालिका हद्दीत मालमत्ता आहे. त्या मालमत्तेचे नामांतर करण्यासाठी त्यांनी नगरपालिकेत अर्ज केला होता. अनेक दिवसांपासून प्रक्रिया केली जात नव्हती. तक्रारदार नगरपालिकेत गेले तेव्हा हे काम बोचरे याने लाचेसाठी अडवून ठेवल्याचे त्यांना कळले. त्यांनी बोचरेकडे चौकशी केली असता त्याने मालमत्तेचे नामांतर करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, अमोल धस, अंमलदार जितेंद्र नंदिले, युवराज हिवाळे यांच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात पंचासमक्ष ५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी नगरपरिषदेतच सापळा रचण्यात आला. जितेंद्र बोचरे याने ५ हजारांची लाच घेताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.