छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : असह्य जीवन जगून मरण येण्यापूर्वी अखेरचा प्रवास सुसह्य आणि सन्मानाने व्हावा अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे आगाऊ वैद्यकीय निर्देश असणारे वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवले तर त्यात ती व्यक्ती शेवटच्या क्षणी व्हेंटिलेटर किंवा इतर साहित्याचा उपयोग करायचा की नाही याच्या सूचना देऊ शकते. यामुळे नातेवाइकांना पुढे होणारा त्रास संपुष्टात येऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती विभा कंकणवाडी या अशा प्रकारचे वैद्यकीय इच्छापत्र (इच्छामरण) नोंदणी करणाऱ्या शहरातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे कस्टोडियन म्हणून न्या. विभा कंकणवाडी यांनी १२ मार्च रोजी दस्तऐवज सुपूर्द केले. आपला अखेरचा प्रवास सुखरूप व्हावा, व्हेंटिलेटरसारख्या वैद्यकीय उपचाराने आपले अखेरचे क्षण लांबवू नयेत, अशी अपेक्षा त्यांनी इच्छापत्रात व्यक्त केली. लिव्हिंग विल असा हा दस्तऐवज आहे. त्याला कायद्याचा आधार आहे. महाराष्ट्र शासनाने ६ मार्च २०२४ रोजी राज्यभरात कस्टोडियन नेमले आहेत. डॉ. पारस मंडलेचा यांनी लिव्हिंग विलबद्दल सांगितले, की अनेकदा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना लाइफ सपोर्टिंग सिस्टिमवर माणूस जिवंत असतो.
डॉक्टरांकडून अनेक आजारांत स्पष्ट कल्पना दिली जाते, की यापलीकडे तब्येतीत सुधारणा होऊ शकत नाही. त्यानंतर व्हेंटिलेटरसारखी साधने रुग्णाला लावली जातात. अशावेळी इच्छापत्र दिलेल्या व्यक्तीचे नातेवाइक, हॉस्पिटलचे पॅनल, महापालिकेचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य समिती उपचार थांबवण्याचा निर्णय घेतात, असे ते म्हणाले. न्या. विभा कंकणवाडी यांनी लिव्हिंग विलमध्ये म्हटले आहे, की म्हातारपणात आजार असताना हाल न होऊ देता शांततेत मरण स्वीकारणे सोयीचे व्हावे यासाठी लिव्हिंग विलची संकल्पना समाजात रूढ होऊ लागली आहे. तिचा प्रसार किंवा त्याबाबतची जनजागृती होणे काळाची गरज आहे.