छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आज, २० मार्चला परमिट रूम व बीअरबार व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६५० परमिट रूम, बीअर बार बंद राहतील, अशी माहिती जिल्हा हॉटेल्स रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारच्या व्हॅट धोरणाचा जाहीर निषेध या आंदोलनातून करण्यात येईल. व्हॅटच्या नावाखाली लादलेला १० टक्के टॅक्स आणि दरवर्षी भरमसाठ वाढणारी परवाना नूतनीकरण फी रद्द करणे, मद्य निर्मितीवर फस्ट पॉइंट टॅक्स लागू करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
महाराष्ट्र बँकेचे कर्मचारीही आज संपावर
कर्मचारी भरती व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही आज, २० मार्चला एक दिवसाचा संप पुकारला आहे. क्रांती चौक येथील बँकेच्या शाखेसमोर सकाळी १०:३० वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संपात व निदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने केले आहे.