मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : अनैतिकतेचा शेवट हा धोकादायकच असतो. पुण्याई कधी कधी आड येऊन वाचवते, इतकंच… मुंबईतील रेल्वेच्या अधिकाऱ्यासोबतही असंच घडलं. बिल्डिंगमध्येच राहणाऱ्या महिलेसोबत ओळख झाल्यानंतर मैत्री झाली. मैत्रीतून प्रेम झालं… दोन मुले, पत्नी असूनही हा अधिकारी तिच्या जाळ्यात अडकला. सुरुवातीला थोडे थोडे पैसे उकळणाऱ्या महिलेने मोठाच गेम रचला. अख्खा दिवस तुझ्यासोबत घालवायचा असं सांगून त्याला हॉटेलमध्ये नेले. एका रूममध्ये दोघांनी दिवसभर शारीरिक संबंध ठेवले. पण ती चोरून त्याचे सर्व फोटो काढत होती. नंतर हेच फोटो काही दिवसांनी त्याच्या व्हॉट्स ॲपवर धडकले अन् अधिकारी नखशिखान्त हादरून गेला… फोटो व्हायरल करायचे नसतील तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली. त्याने दीड लाख रुपये दिलेही. पण उरलेल्या साडेतीन लाख रुपयांसाठी धमकावण्यात येऊ लागल्याने त्याने पत्नीला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ती त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी ब्लॅकमेलर महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेला अटकही केली आहे.
मुंबईच्या पश्चिम रेल्वे विभागात अधिकारी असलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते ४६ वर्षीय पत्नी, एक मुलगा व एका मुलीसह राहतात. सन २०१० मध्ये नवग्रह आय १६० च्या फ्लॅटमध्ये ते राहत असताना पाचव्या माळ्यावर प्रिती ओबेरॉय नावाची महिला राहत होती. त्यांची व तिची तोंडओळख झाली होती. सन २०२१ मध्ये ते काशिमिरा मिरारोड पूर्व भागात राहायला आले. ऑक्टोबर २०२३ मध्ये ते एस्कॉन मंदिर येथे दर्शनासाठी गेले असताना प्रिती ओबेरॉय भेटली. दोघांत बोलणे झाले, त्यावेळी तिने त्यांचा मोबाइल नंबर मागितला. अधिकाऱ्यानेही दिला. त्यानंतर दोन दिवसांनी तिचा फोन आला. त्यानंतर दोघांचे एकमेकांशी फोनवर बोलणे होऊ लागले. फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रितीने कॉल करून अधिकाऱ्याला माझा मुलगा ॲडमीट असून मला पैशाची गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी अधिकाऱ्याने तिला १० हजार रुपये पाठवले. त्यानंतर दोघांत फोनवर नेहमी बोलणे होत होते. कधीकधी भेटणेही होऊ लागले.
ती कोणत्या ना कोणत्या कारणाने अधिकाऱ्याकडे कधी २ हजार, कधी ५ हजार रुपये मागत होती. अधिकारीही तिला मदत करत होते. काही दिवसांनी तिने फोन करून तुम्ही मला आवडता. माझं तुमच्यावर प्रेम आहे, असे बोलू लागली. त्यावर अधिकाऱ्याने तिला सांगितले, की माझं लग्न झालं असून, मला दोन मुले आहेत. त्यावर तिने मला त्याच्याशी काही देणे घेणं नाही, असे सांगितले. त्यानंतर दोघे भेटू लागले. ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रिती पुण्याला राहण्यास गेली. त्यानंतर दोघांत केवळ फोनवर बोलणे होत होते. ३ जानेवारी २०२५ रोजी प्रितीने अधिकाऱ्याला कॉल करून मला तुम्हाला भेटायचं आहे, असे सांगितले. त्यानुसार दोघे ४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास मीरारोड येथे भेटले. तिने मला तुमच्यासोबत आजचा दिवस घालवायचा आहे, असे सांगून आपण हॉटेलमध्ये जाऊ, असे म्हणाली. दोघे बोईसर (जि. पालघर) येथे रेहान्स ग्रॅन्ड हॉटेलमध्ये गेले. तेथे एक रूम घेऊन दोघे तिथेच थांबले. त्यानंतर ५ जानेवारी २०२५ रोजी अधिकाऱ्याने तिला मिरारोड रेल्वेस्टेशन येथे सोडले. त्यानंतर ती पुण्याला निघून गेली. त्यानंतर कॉलवर दोघांत बोलणे होत होते.
…अन् मौज अंगलट आली!
७ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून अधिकाऱ्याला काही फोटो आले. ते पाहून अधिकारी हादरलाच. ते फोटो ४ जानेवारी २०२५ रोजी रेहान्स ग्रॅन्ड, बोईसर येथील हॉटेलमध्ये ते व प्रिती असे एका रूममध्ये बेडवर सोबत असतानाचे होते. ते फोटो पाहून अधिकाऱ्याला धक्का बसला. त्याचवेळी फोटो आलेल्या मोबाइल नंबरवरून कॉल आला व तुम्ही जर लाख रुपये दिले नाही तर मी तुमचे फोटो तुमच्या सोसायटीवर व सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली. तेवढ्यात प्रितीनेही कॉल करून आपले हॉटेलमधील फोटो माझ्या मोबाइलवर आल्याचे सांगून माझ्याकडे ५ लाखांची मागणी केली असल्याचे सांगितले. त्यावर अधिकाऱ्याने तिला विचारले, की हॉटेलमध्ये आपल्या दोघांव्यतिरिक्त आणखी कोणी नसताना फोटो कोण काढू शकेल? मात्र तिने त्याबाबत काही उत्तर दिले नाही. ती आपण त्या ब्लॅकमेलरला ५ लाख रुपये देऊ, असे सांगू लागली तेव्हा अधिकाऱ्याला तिच्याबद्दल संशय आला. मात्र बदनामी नको म्हणून अधिकाऱ्याने माझ्याकडे दीड लाख रुपये आहेत, आपण देऊ, असे सांगितले. त्यानंतर ब्लॅकमेलरला फोन करून ९ मार्च २०२५ रोजी दुपारी १ पर्यंत दादर शिवनेरी बस स्टॉपजवळ अधिकाऱ्याने बोलावले. अधिकाऱ्याने प्रितीलाही कॉल केला व दादर येथे येण्यास सांगितले.
ठरल्यानुसार, ९ मार्चला दुपारी साडेबाराच्या सुमारास दादर शिवनेरी बसस्टॉप येथे अधिकारी पोहोचला. तिथे प्रितीही भेटली. जवळच असणाऱ्या अशोक हॉटेल फॅमिली रेस्टॉरंटमध्ये दोघे बसले. तेवढ्यात ब्लॅकमेलरचा कॉल आला. त्याने ते पैसे प्रितीकडे देण्यास सांगितले. त्यावर अधिकाऱ्याने नकार देऊन ते पैसे तुझ्याच हातात देतो, असे सांगितले. परंतु तो काहीही न ऐकता अधिकाऱ्यालाच शिवीगाळ करू लागला व उर्वरित साडेतीन लाख रुपये दोन दिवसांत दे, नाहीतर तुझी बदनामी करीन, अशी धमकी देऊ लागला. तेव्हा प्रितीने ते पैसे माझ्याकडे द्या. मी त्याला ते पैसे देते, असे सांगू लागली. तेव्हा अधिकाऱ्याने तिच्याकडे दीड लाख रुपये दिले. उर्वरित पैसे लवकर जमा करा, असे सांगून ती टॅक्सीमध्ये बसून निघुन जात असताना तिच्यासोबत एक अनोळखी व्यक्तीदेखील तिच्या टॅक्सीमध्ये बसून जात असल्याचे अधिकाऱ्याला दिसले. त्याचवेळी अधिकाऱ्याला खात्री पटली, की प्रिती साथीदारांसह ब्लॅकमेल करून पैसे मागत आहे. मात्र तरीही घाबरून अधिकाऱ्याने कोणास काहीएक सांगितले नाही.
अखेर प्रितीचा खरा चेहरा आला समोर!
१० मार्चपासून १६ मार्चपर्यंत प्रिती वारंवार फोन करून उर्वरित पैसे जमा केले, अशी विचारणा करत होती. अधिकारी तिला माहिती देण्यास टाळाटाळ करत होता. तेव्हा प्रितीचा खरा चेहरा समोर आला. ती धमकावण्यावर उतरली. ती म्हणाली, की मी तुझ्या घरी येऊन तुझ्या बायकोला सर्व हकीकत सांगून तुझी बदनामी करीन. तिचा साथीदारही फोन करून फोटो सोशल मीडियावर व सोसायटीत व्हायरल करीन, अशी धमकी देऊ लागला. यावरून प्रिती व ब्लॅकमेलर हे संगनमताने हा प्रकार करत असल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पत्नीला झालेला सर्व प्रकार समजावून सांगितला. तेव्हा घरातील मंडळींनी अधिकाऱ्याला धीर देऊन पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार अधिकारी काशिमिरा पोलीस ठाण्यात गेला आणि तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी प्रिती व तिच्या ब्लॅकमेलर साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे करत आहेत. पोलिसांनी प्रितीला अटक केली असून, तिचा साथीदार फरारी आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.