छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दहावीचा पेपर देण्यासाठी गेलेली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. अपहरणाची तक्रार तिच्या आईने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (१८ मार्च) दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
ब्रिजवाडीत राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ती खासगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविते. तिला एक मुलगा, दोन मुली आहेत. पैकी लहान मुलगी १६ वर्षांची असून, ती दहावीत शिकते. तिची सध्या दहावीची परीक्षा चालू आहे. सोमवारी (१७ मार्च) सकाळी साडेनऊच्या सुमारास दहावीचा पेपर असल्याने ब्रिजवाडी येथून पेपर देण्यासाठी जाते, असे सांगून ती पेपरचे साहित्य, बॅग घेऊन घरातून निघाली. मात्र नेहमीप्रमाणे संध्याकाळी साडेपाचपर्यंतही घरी आली नाही.
त्यामुळे तिच्या आईने तिच्यासोबत परीक्षा देणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. मैत्रिणीने सांगितले, की सकाळी साडेनऊच्या सुमारास मी आणि तुमची मुलगी पेपर देण्यासाठी सिडको एन ५ येथील धर्मवीर संभाजी हायस्कूलकडे निघालो. घरापासून थोडे अंतरावर असलेल्या वडाच्या झाडाजवळ ब्रिजवाडी येथे तुमच्या मुलीने पेपरचे साहित्य, पॅड माझ्याकडे दिले. ती काहीही एक न सांगता कोठेतरी निघून गेली. तिच्या या माहितीवरून मुलीच्या आईने तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.अखेर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार देण्यात आली. मुलीने जाताना काळे जॅकेट आणि आकाशी जिन्स पँट घातलेली होती. पोलीस अंमलदार लखनसिंग पाचलोरे अधिक तपास करत आहेत.