छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १ लाख रुपये माहेरावरून आणण्यास असमर्थ ठरलेल्या ३० वर्षीय विवाहितेला पतीने धक्कादायक सल्ला दिला. तू वाटल्यास अनैतिक कामे कर, असे पती म्हणाला. तिने नकार ठाम ठेवल्यावर तिचे दागिने काढून घेतले, बेदम मारहाण केली. तिने तसेच माहेर गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तिच्या पती, सासू, सासऱ्याविरुद्ध मंगळवारी (१८ मार्च) गुन्हा दाखल केला आहे.
३० वर्षीय विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली. ती न्यू विद्यानगर, बीड बायपास, सातारा परिसर येथे ७ महिन्यांपासून माहेरी ३ वर्षांच्या मुलीसह राहत आहे. तिचे लग्न १६ ऑगस्ट २०२० रोजी झाले होते. लग्नानंतर ती सासरी रामनगरजवळील विठ्ठलनगरात राहायला गेली. सुरुवातीचे पंधरा दिवस तिला सासरच्यांनी व्यवस्थित वागणूक दिली. नंतर एकेदिवशी पती दारू पिऊन घरी आला व तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर किरकोळ कारणावरून तो नेहमी तिच्याशी वाद करून शिवीगाळ करून मारहाण करीत होता, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. एकेदिवशी पतीने बचतगटाचे हप्ते भरायचे म्हणून तिचे सोन्याचे कानातील दागिने घेऊन गेला. काही दिवसांनी तिने परत मागिले असता त्याने तिला मारहाण केली.
घराबाहेर काढून दिले. त्यानंतर नातेवाइकांनी मध्यस्थी केल्याने ती परत नांदायला गेली असता काही दिवसांनी त्याने परत तिला त्रास देण्यास सुरुवात केली, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. ३५ वर्षीय पती, ६० वर्षीय सासू, ७० वर्षीय सासरा (सर्व रा. बजरंगनगर, केंब्रिज चौक, चिकलठाणा) यांनी या ना त्या कारणावरून शिवीगाळ करून नेहमी घालून पाडून बोलून रिक्षा घेण्यासाठी माहेरवरून १ लाख रुपये आण, अशी मागणी केली. विवाहितेने माझ्या माहेरच्यांकडे एवढे पैसे आता नाहीत व ते सध्या देणार नाही, असे म्हटल्यावर पतीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पती, सासू व सासरे तिला म्हणाले की, तू वाटल्यास अनैतिक काम कर, आपल्याला पैसे मिळतील… त्यावेळी त्यांनी तिचे सोन्याचे दागिने काढून घेतले व मला मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रणजितसिंग चव्हाण करत आहेत.