छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : समाज कल्याण निरीक्षक पदाच्या ऑनलाइन परीक्षेत एक विद्यार्थी मोबाइलद्वारे कॉपी करताना रंगेहात पकडला गेला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (१८ मार्च) चिकलठाणा MIDC तील आय-ऑन डिजिटल झोन परीक्षा केंद्रावर दुपारी समोर आला.
अक्षय फकिरचंद चव्हाण (वय ३१, रा. जवाहर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. समाज कल्याण निरीक्षक सुरेश एकनाथ डोंगरे (वय ५८, रा. हडको गजानननगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. मंगळवारी (१८ मार्च) आय-ऑन डिजिटल झोन परीक्षा केंद्र, चिकलठाणा MIDC येथे ते परीक्षा निरीक्षक म्हणून नियुक्त होते. या ठिकाणी समाज कल्याण निरीक्षक या पदाची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. दुपारी १ ते ३ अशी परीक्षेची वेळ होती.
परीक्षा केंद्रात CCTV बसवलेले होते. अक्षयच्याच परीक्षा खोलीत बसलेल्या एका विद्यार्थ्याने वॉशरूमला जाताना पर्यवेक्षक संध्या रगडे यांना अक्षय मोबाइलद्वारे कॉपी करत असल्याचे सांगितले. पर्यवेक्षक संध्या रगडे यांनी केंद्रप्रमुख व डोंगरे यांना कळवले. केंद्रप्रमुख परमेश्वर जामकर यांनी परीक्षा केंद्रातील CCTV कॅमेऱ्यांचे मॉनिटरींग करणाऱ्या मिलिंद प्रधान यांना सांगितले, संशयित परीक्षार्थीला तपासा. प्रधान यांनी त्याच्याकडे जाऊन त्याच्या टेबलवर निरखून पाहणी केली असता सीपीयूमागे एक रेडमी ४ कंपनीचा मोबाईल फोन आढळला. त्याला प्रधान हे केंद्रप्रमुख व डोंगरे यांच्याकडे घेऊन आले. त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे करत आहेत.