अमरावती (सीएससीएन न्यूजडेस्क) : भिन्न समाजाच्या मुला-मुलीचा प्रेम विवाह सुरू असताना मुलीच्या नातेवाइकांनी तिथे येऊन राडा घातला. ही घटना सोमवारी (१७ मार्च) दुपारी दीडच्या सुमारास पथ्रोट (जि. अमरावती) येथील आर्य समाज मंदिरमध्ये घडली.
ठाणेदार सचिन पुंडगे, पोलिस पाटील नितीन गोरले व पोलिसांनी हे प्रकरण हाताळून पूर्वीच्या तक्रारीनुसार प्रेमीयुगुलांना परतवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. नागेश (वय २४, रा. पथ्रोट) असे युवकाचे नाव आहे. तीन महिन्यांपूर्वी परतवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील येणी पांढरी या गावातील अल्पवयीन मुलीला संशयित नागेश याने पळवून नेल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी परतवाडा पोलिस स्टेशनमध्ये नोंदविली होती. तेव्हापासून त्या प्रेमीयुगुलाची शोध मोहीम सुरू होती.
सोमवारी ते विवाहाकरिता पथ्रोट येथील आर्य समाज मंदिरात दाखल झाले. याची माहिती मुलीच्या नातेवाइकांना झाली. ते मोठ्या संख्येने आर्य समाज मंदिरावर धडकले. त्यांनी लग्नाला प्रचंड विरोध केला. यादरम्यान स्थानिक लोकांशी त्यांची प्रचंड झोंबाझोंबी, शिवीगाळ झाली. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जात असल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती पडताच पथ्रोट पोलिसांनी दोघांनाही त्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून परतवाडा पोलिसांना कळविले. प्रेमीयुगलांना ताब्यात घेण्यात आले.