यवतमाळ (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्नाच्या पत्नीला सोडून युवक विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. हे अनैतिक संबंध समोर येताच महिलेच्या दोन मुलांनी मित्राला सोबत घेऊन युवकाचा खून केला. ही घटना सोमवारी (१७ मार्च) पहाटे दोनच्या सुमारास वाघापूर (जि. यवतमाळ) येथे घडली. लोहारा पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
आशिष माणिकराव सोनोने (वय ३४, रा. प्रिया रेसिडेन्सी, चौसाळा रोड, बोधड, जि. यवतमाळ) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. त्याचे वाघापुरातील महिलेशी प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आशिषची पत्नी मुलीला घेऊन विभक्त राहत होती. १५ मार्च रोजी दुपारी आशिषला प्रेयसीच्या मुलाने जिवे मारण्याची धमकी दिली होती. ही माहिती आशिषने त्याची आई सुनीता सोनोने यांना दिली. १७ मार्च रोजी आशिष त्याच्या प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत घराबाहेर निघाला.
तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही. आईचे अनैतिक संबंध पाहून तिच्या मुलांना राग येत होता. अखेर त्यांचा संयम सुटला. दोघांनी आशिषला गाठून चाकूने भोसकून नंतर त्याच्यावर दगडाने प्रहार केला. यात आशिषचा जागीच मृत्यू झाला. हल्ला होत असताना आशिषने आरडाओरडा केल्याने परिसरातील काही नागरिक मध्यरात्री २ वाजता घराबाहेर आले होते. सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम आला आहे. लोहारा पोलिसांना रात्रीच खुनाची माहिती मिळाली. त्यावरून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात दोन सख्खे भाऊ असून त्यांचे मित्र प्रशिक मुकुंदा दवणे, अंकुश डुबाजी चावरे यांचाही सहभाग आहे.