मुंबई : मीरा-भाईंदरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसई-विरार पोलिसांनी ७५ वर्षीय वृद्धाची हत्या केल्याच्या आरोपाखाली १६ वर्षीय मुलीला आणि तिच्या १७ वर्षीय मित्राला अटक केली आहे. असा आरोप आहे की, वृद्धेने मुलीशी गैरवर्तन केले, त्यानंतर तिने तिच्या अल्पवयीन प्रियकराला बोलावले आणि दोघांनी मिळून वृद्धाची हत्या केली. ही घटना भाईंदरच्या उत्तन भागात घडली. पोलिसांनी मुला-मुलीला ताब्यात घेऊन भिवंडी बालगृहात ठेवले आहे.
किशोर ब्रिजमोहन मिश्रा (वय ७५, रा. गणपत पाटीलनगर, लिंक रोड, बोरीवली पश्चिम) असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्याचे नायगावला छोटे दुकान होते. सीसीटीव्ही फूटेजमध्ये मिश्रा हा १५ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या १६ वर्षीय मुलीसह नायगाव रेल्वेस्थानकात लोकल पकडताना दिसले होते.
दोघांची ओळख वर्षभरापूर्वीच…
पोलिसांनी सांगितले की, मुलीची त्या मुलाशी सुमारे एक वर्षापूर्वी मैत्री झाली होती. मुलीच्या कुटुंबाला हे कळताच त्यांनी विरोध केला. मुलगी दीड महिन्यापूर्वी रागाच्या भरात घराबाहेर पडली आणि एकटीच रस्त्यावर आली. ती कशीतरी इकडे तिकडे काम करून जगत होती. किशोर मिश्रा याने तिला रस्त्यात एकटी पाहून त्याच्यासोबत कामावर ठेवले. त्याने मुलीच्या मूलभूत गरजा पूर्ण करायला सुरुवात केली. त्याने महिन्याच्या शेवटी मुलीला काही रोख रक्कम देण्याचे आश्वासन दिले.
तथापि, १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास, त्या वृद्धाने तिला काही कामासाठी सोबत येण्यास सांगितले. सुरुवातीला दोघे ट्रेनने गेले, त्यानंतर त्यांनी ऑटो रिक्षा घेतली. मुलीचा दावा आहे की, मिश्राने चालत्या ऑटोरिक्षात तिला अयोग्यरित्या स्पर्श करायला सुरुवात केली. तिने त्याला ढकलले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. मिश्राने हॉटेलमध्ये खोली शोधण्यासाठी एका जंक्शनवर रिक्षा थांबवली. तोपर्यंत मुलीने प्रियकराला लोकेशन पाठवून ठेवले होते. त्यामुळे तोही लगेच तिथे धडकला. मुलीने आणि तिच्या प्रियकराने मिळून दगड, फरशीने वृद्धाचे डोके ठेचले. नंतर वृद्धाचा मृतदेह झुडपात फेकून दिला.
पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबीयांनी १६ फेब्रुवारी रोजी मीरा-भाईंदर-वसई-विरार येथील पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. त्याच वेळी, दुसऱ्या एका पोलीस ठाण्यात एका वृद्धाचा विद्रूप मृतदेह आढळला. तथापि, पोलिस स्टेशनमधील (जिथे बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल करण्यात आली होती) अधिकाऱ्यांनी तो शेवटचा १६ वर्षांच्या मुलीसोबत दिसल्याचे लक्षात आल्यावर सुगावा शोधण्यास सुरुवात केली. शनिवारी मुलीला ताब्यात घेण्यात आले आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि नंतर तिच्या अल्पवयीन प्रियकरालाही अटक करण्यात आली. प्रियकराने पोलिसांना सांगितले, की वृद्धाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता आणि त्याने तिला पगारही दिला नव्हता.
मिश्रा वासनांध झाला होता…
महिन्याचा पगार न दिल्याने मुलीने मिश्राच्या मोबाइलमधून काही रक्कम प्रियकराच्या बहिणीच्या नंबरवर पाठवली होती. मिश्रा पैसे परत मागून पोलिसांत देण्याची भीती दाखवत असायचा. यातून त्याची नियत फिरली आणि त्याने मुलीला घेऊन हॉटेलच्या खोलीवर जात होता. तिने भाईंदरमध्येच राहणाऱ्या तिच्या प्रियकराला कळवले. चौक येथील दर्गाजवळ मिश्रा रिक्षातच कपडे ओढू लागला होता, असे मुलीने पोलिसांना सांगितले.