पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्नीला भेटायला तिच्या माहेरी आलेल्या पतीला पैठणमध्ये वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले. दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून लघुशंकेसाठी गेला असता दोन चोरटे आले आणि गाडीच्या सीटवर ठेवलेला मोबाइल व पैशांचे पाकीट घेऊन पळून गेले. ही घटना रविवारी (१६ मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास पैठण शहरातील गोलनाका येथे घडली.
पांडुरंग नारायण गव्हाणे (वय २७, रा. बादली ता. घनसावंगी जि.जालना) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो मासेमारी करतो. कुटुंबासह राहतो. त्याची पत्नी प्रसुतीसाठी माहेरी लक्ष्मीनगर, पैठण येथे आलेली असल्याने तो रविवारी (१६ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सासरवाडीला पैठण येथे आला होता. सोबत पत्नीच्या दवाखान्याच्या खर्चासाठी ३० हजार रुपये घेऊन आला होता. रात्री साडेआठच्या सुमारास तो मोटारसायकल घेऊन गोलनाका येथे गेला.
तिथे शेवगावच्या दिशेने तोंड करून मोटारसायकलवर सॅमसंग कंपनीचा मोबाईल व ३० हजार रुपये असलेले पाकीट गाडीच्या सीटवर ठेवून लघवी करण्यासाठी थोडा बाजूला गेला असता दोन अनोळखी व्यक्ती (वय अंदाजे ३० ते ३५) सडपातळ बांध्याचे एकाच्या अंगात टी-शर्ट व एकाच्या अंगावर शर्ट घातलेले व दोघांनी तोंडाला काळे मास्क लावलेले असे आले. त्यांनी पांडुरंगचा १५ हजार रुपयांचा मोबाइल व ३० हजार रुपये असलेले पाकीट घेऊन अंधारात पळून गेले. पैठण पोलिसांनी दोन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दशरथ बारकुल करत आहेत.