मुंबई/ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात होळीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी उल्हास नदीत चार किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. १५-१६ वयोगटातील मुले धुलिवंदन साजरे केल्यानंतर आंघोळीसाठी नदीत उतरले होते आणि पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते वाहून गेले. हे चारही विद्यार्थी दहावीत होते. उल्हास नदी ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांमधून वाहते.
बुडालेल्या मुलांची ओळख पटली असून त्यांची नावे आर्यन मेदार (१५), ओम सिंग तोमर (१५), सिद्धार्थ सिंग (१६) आणि आर्यन सिंग (१६) अशी आहेत. हे सर्वजण चामटोली येथील पोद्दार गृह संकुलातील रहिवासी आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि ते शवविच्छेदनासाठी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली होती. यापूर्वी महाराष्ट्रात नदीत बुडण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यानंतर सरकारने अशा ठिकाणी सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपली मुले गमावली त्यांच्यासाठी होळीचा सण दुःखाचा बनला.