छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लोकसभेत महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. तरीही मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मते दिली. एमआयएमने इम्तियाज जलील हा एकमेव मुस्लिम उमेदवार दिला होता. मात्र, सर्वांनी त्यांना पाडले. महाविकास आघाडीने एटीएम मशीनप्रमाणे मुस्लिम मतांचा वापर केला, असे परखड मत एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरातील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
शनिवारी (१३ जुलै) सकाळी ओवेसी यांचे शहरात आगमन झाले. नेत्यांसह कार्यकर्त्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. ते खासगी हॉटेलमध्ये थांबले. सकाळपासून राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा आढावा होता, असे सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ओवेसी म्हणाले, की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देशात १० ठिकाणी मॉब लिचिंगच्या घटना घडल्या. देशातील मुस्लिमांवर सर्वाधिक अन्याय होतोय. मनोज जरांगे हे अभिनंदनास पात्र असून त्यांच्यामुळे मराठवाड्यात मराठा उमेदवार निवडून आले. देशात मुस्लिमांचे प्रमाण १४ टक्के आणि लोकसभेत नेतृत्व फक्त ४ टक्के आहे. मुस्लिमांची मते घेणाऱ्यांनी याचा विचार करावा, असे ओवेसी म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादीवर हल्ला चढवत ओवेसी म्हणाले, की ४० वर्षांनंतर महाराष्ट्र विधान परिषद मुस्लिम आमदाराविना आहे. जिथे पक्ष मजबूत आहे, तेथे आम्ही लढणार आहोत. अद्याप कोणत्याही पक्षासोबत आमची युतीसंदर्भात चर्चा नाही. स्वबळावर विचार करतोय. नेमक्या किती जागा लढविणार, हे निश्चित नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांमध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळतील. कोण कुठे जातेय, हे बघावे लागेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या विधानसभेत इम्तियाज जलील दिसणार का? या थेट प्रश्नावर ओवेसी म्हणाले पुढील काही दिवसांत ते महाराष्ट्राच्या राजकारणात मोलाची भूमिका बजावणार आहेत. जरांगे किंवा इतरांचा युतीचा प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. एमआयएममधील गटबाजी, मुस्लिमबहुल भागात पक्षाची कमी मते, वंचितसोबत तुटलेली युती यावर त्यांनी उत्तर देणे टाळले. केवळ टोलवाटोलवी केली.