छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : ‘चला जाणून घेऊ या मतदान केंद्राला ( Know Your Polling Station)’ हा उपक्रम शनिवार दि.१३ व रविवार दि.१४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात मतदारांना मतदान केंद्राची माहिती देणे तसेच त्यासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेण्यात येत आहेत. याअंतर्गत आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सावंगी येथील मतदारांशी संवाद साधला.
‘चला जाणून घेऊ या मतदान केंद्राला’ या उपक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी १०६ फुलंब्री मतदार संघात सावंगी येथील मतदान केंद्र क्रमांक १५२,१५३, १५४ येथे भेट दिली. मतदारांशी संवाद साधला तसेच मतदान केंद्र पाहणी करुन त्याबद्दल ची माहिती दिली. तसेच सारा परिवर्तन गृहनिर्माण सोसायटी मध्ये नव्याने होणाऱ्या मतदान केंद्राच्या जागेचीही पाहणी केली.
सरपंच श्रीमती आश्विनी जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा १०६ फुलंब्रीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण फुलारी, पैठण उपविभागीय अधिकारी तथा ११० पैठणच्या निवडणूक निर्णय अधिकारी निलम बाफना, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार कृष्णा कानुगळे, उपसरपंच अफजल शहा, तसेच परिसरातील मतदार, सह.गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सभासद आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की,‘चला जाणून घेऊ या मतदान केंद्राला’ हा उपक्रम दि.१३ व १४ जुलै रोजी जिल्हाभरात राबविला जात आहे. शहरी भागात अप्पर आयुक्त मनपा, मुख्याधिकारी नपा आणि ग्रामिण भागात तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी हे आयोजन करावयाचे आहे. बीएलओ, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत उपस्थित सर्व मतदारांना मतदान केंद्राविषयी माहिती देण्यात येईल. नकाशा व सादरीकरण केले जाईल. त्यानंतर मतदारांनी केलेल्या सुचनांमधून माहिती घेऊन मतदान केंद्रात बदल करण्याबाबतची माहिती तयार करुन नंतर प्रत्यक्ष पाहणी, पर्यायी व्यवस्था यांचा अहवाल तयार केला जाईल.
सावंगी येथेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी प्रत्यक्ष भेटून मतदारांना माहिती दिली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.