छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद येथील औरंगजेबरची कबर हटविण्यासाठी सध्या सर्वस्तरावर आक्रमकता दिसून येत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा संसदेत मांडून ही कबर हटविण्याची मागणी केली आहे.
खा. म्हस्के संसदेत म्हणाले, की भारतीय संस्कृतीशी काही देणेघेणे नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशांचे आपण गेली ७५ वर्षे ऐतिहासिक या गोंडस नावाखाली जतन करत आलो आहोत. ज्या क्रूरकर्म्याने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी अतोनात छळले. हजारो हिंदू धर्मियांची मंदिरे तोडली. धर्मांतरासाठी शिखांचे ९ वे धर्मगुरू तेजबहादूरसिंग यांना चांदनी चौक येथे मारले, १० वे धर्मगुरू गुरुगोविंदसिंग यांच्या दोन्ही मुलांना चार भिंती आड मारले अशा औरंगजेबाची कबर खुलताबाद येथे आहे. त्या कबरीचे संरक्षण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) करत असून ही बाब संतापजनक आणि लज्जास्पद आहे, असे खा. म्हस्के म्हणाले.