जालना (सीएससीएन वृत्तसेवा) : धामणगाव धाड (ता. जि. बुलडाणा) येथे एका जुन्या मोठ्या घरात गुप्तधन असून ते धन काढण्यासाठी नरबळी देण्यासाठी ज्ञानेश्वर भिका आहेर (वय ३०, रा. वालसा वडाळा, ता. भोकरदन) यांना त्यांची मुलगी देण्यासाठी स्वयंघोषित साधू गणेश दामोधर लोखंडे (रा. धामणगाव धाड) ब्लॅकमेल करत होता. सुरुवातीला मंदिरात ओळख करून घेतली, नंतर दाम्पत्याशी सलगी साधून घरी बोलवायला सुरुवात केली. नंतर काळात त्याचे इरादे वेगळेच असल्याचे लक्षात आल्यावर दाम्पत्याने संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लोखंडे हट्टाला पेटला, दाम्पत्याला प्रचंड त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर आहेर यांनी ३ मार्चला गळफास घेऊन आत्महत्या केली. भोकरदन पोलिसांनी लोखंडेला गुम्मी (ता. बुलडाणा) येथील मठातून अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
कशी झाली ओळख…
सौ. अंजना (वय २५) हिचे लग्न २०१७ मध्ये वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर आहेरसोबत झाले होते. लग्नानंतर दोघे धामणगाव धाड (ता. जि. बुलडाणा) येथील श्यामराव बाबा यांच्या मंदिरात दर्शनासाठी महिन्यातून एकदा जायचे. मंदिरात धामणगाव धाड येथीलच भोंदू साधू गणेश दामोधर लोखंडे हा दिसत असे. काही दिवसांनी या दाम्पत्याची ओळख गणेशसोबत झाली. दर महिन्याला जात असताना कधी कधी या दाम्पत्याला तो त्याच्या घरी चहा पिण्यासाठीही घेऊन जात होता. २७ नोव्हेंबर २०२० रोजी दाम्पत्याला मुलगी झाली. तिचे नाव ईश्वरी ठेवले. तिला घेऊनही हे दाम्पत्य धामणगाव धाड येथे दर्शनासाठी येऊ लागले होते.
गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा कट
धामणगाव धाड येथील एका जुन्या घरात मोठे गुप्तधन असून काढण्यासाठी नरबळी द्यायचा, असे लोखंडे याने ज्ञानेश्वर आहेर यांना सांगून त्यांची पाच वर्षांच्या मुलगी नरबळी देण्यासाठी मागितली. मुलगी पायाळू आहे, हे लोखंडे याला माहिती होते. त्याने धामणगाव येथे एक जीर्ण असलेले घर २ लाख रुपयांत विकत घेतले. त्या ठिकाणी गुप्तधन आहे ते काढण्यासाठी त्याने दीड वर्षात ३ बाय ३ चा २० फूटांचा खोल खड्डाही त्याने खोदला होता. नरबळी देण्यासाठी ज्ञानेश्वर आहेर यांना लोखंडे ही मुलगी माझीच आहे, असा दावाही करू लागला. लोखंडे हा भांडखोर असल्याने त्याच्याशी गावातील कुणी जास्त संपर्कातही नव्हते. त्याचा विवाह झालेला असून २० वर्षे वयाचा एक मुलगासुध्दा आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक ब्रेकर मशीन व एक पुस्तक जप्त केले आहे. त्याच्याकडे अनेक जण यायचे. त्यांचा तो गैरफायदा घेत होता. त्याची १० मार्चला पोलीस कोठडीची मुदत संपली. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.