छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाभार्थी महिलांची ऑनलाईन ॲपद्वारे नोंदणी सुरु झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७९ हजार २६६ महिलांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री; माझी लाडकी बहिण या योजनेची नाव नोंदणी सुरु असून ही नोंदणी प्रत्यक्ष गावातच नारी शक्ती दूत या ॲपद्वारे अंगणवाडी सेविका, मदतनीस या करीत आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका व शहरी भागात वार्ड ऑफिसर, अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण ही झाले आहे. नोंदणी ही ऑफलाईनही करता येते. इंटरनेट सुरळीत नसल्यास ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करुन नंतर माहिती ऑनलाईन अपलोड करता येते. जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ७७८ ऑनलाईन तर ६२ हजार ४८८ ऑफलाईन अशा एकूण ७९ हजार २६६ महिलांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती श्रीमती जाधव यांनी दिली आहे.
या योजनेस महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून नोंदणीसाठी महिलांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याद्वारे हे अर्ज जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तर समितीकडे अंतिम मंजूरीसाठी येतील.
जिल्हास्तर समितीची रचना याप्रमाणे-
अध्यक्ष संबंधित जिल्हाधिकारी, सहअध्यक्ष संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सदस्य सचिव संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सर्व सदस्य संबंधित पोलीस अधीक्षक, जिल्हा सहआयुक्त नगर प्रशासन, जिल्ह्यातील महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी (उप आयुक्त दर्जापेक्षा कमी नसावे) संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्यधिकारी.
वर्षाला 18 हजार रुपयांचा लाभ
या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दर महिन्याला १५०० रूपये दिले जाणार आहे. तसेच केंद/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहेत. याचाच अर्थ पात्र लाभार्थी महिलेल एका वर्षात १८ हजार रूपये मिळणार आहेत.
सुलभ प्रक्रिया
या योजनेचा लाभ राज्यभरातील अधिकाधिक महिलांना घेता यावा यासाठी अनेक अटी शिथिल करत ही प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. आता २१ ते ६५ वर्ष या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियाही सोपी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. जिथे अशक्य आहे, तिथे ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्रामार्फत अर्ज जमा करता येईल. आणि घरच्या घरी मोबाईलवरुनही ‘नारीशक्तीदूत’ या ॲपवरूनही अर्ज भरता येईल.
पात्रता
२१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना लाभ
लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक.
लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे आवश्यक .
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे
पिवळे व केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
विवाहित,विधवा, घटस्फोटीत,परितक्त्या, निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचा जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्रातील जन्मदाखला
सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पनाचा दाखला.
बॅंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
पासपोर्ट साईजचा फोटो.
रेशन कार्ड
या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
अर्ज कसा करावा?
ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये/ग्रामपंचायत/वॉर्ड/सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध आहे.
अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/ वार्ड अधिकारी यांनी ऑनलाईन प्रस्तावित केल्यावर लाभार्थी महिलेचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर होईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे.
अर्जदार महिलेने अर्ज करताना स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल व बॅंक खात्याशी संबंधित ई-केवायसी करता येईल.