छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एथर एनर्जी कंपनी बिडकीन औद्योगिक वसाहतीत २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यामुळे ४ हजार बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादनासाठी या कंपनीला १०० एकर जमिनीचे वाटपपत्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामुळे उद्योग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एथर एनर्जीमुळे छत्रपती संभाजीनगर व मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. जमिनीचे पत्र देताना शासनाच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, एमआयटीएलचे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, एथर एनर्जी कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर संजीवकुमार सिंह, मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे प्रमुख विमल कांत, श्रीकांत विश्वेसरण आदी उपस्थित होते.
एथर एनर्जी कंपनीची स्थापना २०१३ मध्ये तरुण मेहता व स्वप्निल जैन यांनी केली. भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एथर एनर्जी तिसरी मोठी कंपनी असून, कंपनीने इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची पायाभूत सुविधा देशभर उभारली आहे. सध्या कंपनीमार्फत ५ प्रकारच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची निर्मिती करण्यात येते. कंपनीची वार्षिक उत्पादनक्षमता १ लाख १० हजार स्कूटर्स आणि १ लाख २० हजार बॅटरी पॅक एवढी असून, देशातील १५ राज्यांमधील २७ शहरांत कंपनीचा विस्तार असल्याचे सूत्रांनी सांगितले.