छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : अवैध वाळूमाफिया आणि महसूल प्रशासनाचे संबंध, त्यातच काही दिवसांपूर्वी निवृत्त पोलिसाने छत्रपती संभाजीनगरच्या तहसीलदारांना दिलेली वागणूक, पैठणच्या तहसीलदाराला वाळू व्यावसायिकाकडून लाच घेताना पकडले जाणे या गोष्टींमुळे महसूल आणि पोलीस दोन्ही विभाग चर्चेत आले आहेत. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनीच गौण खनिजाचे अवैध वाहतूक आणि उत्खनन रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. स्थिर पथके व चेक पोस्ट तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. गौण खनिज उत्खनन होण्याच्या शक्यता असलेल्या जागांच्या मार्गांवर ही पथके तैनात करण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले असून, जिल्ह्यात ३९ ठिकाणी ही पथके तैनात करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी दिली आहे.
तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीतील स्थिरपथके तपासणी नाके असे…
अप्पर तहसील कार्यालय, छत्रपती संभाजीनगर : नगर नाका, छावणी, वाल्मी नाका पैठण रोड
तहसील कार्यालय (ग्रामीण) : केंब्रीज शाळा चौफुली, जालना रोड, चिकलठाणा, सावंगी टी पॉइंट, जळगाव रोड सावंगी, पिसादेवी पळशी चौफुली, सावंगी- केंब्रीज शाळा बायपास रोड, पिसादेवी , करमाड पिंप्री राजा टी -पॉइंट, करमाड पोलीस स्टेशनजवळ, करमाड, झाल्टा फाटा टी पॉइंट, बीड बायपास रोड झाल्टा.
तहसील कार्यालय पैठण : पैठण- शेवगाव रोडवर बलदवा माळा, मौजे पैठण हद्द, पैठण- छत्रपती संभाजीनगर रोडवर, हॉटेल सह्याद्री चौक, आपेगाव रोड कमान, शेवगाव रोड, नाथ मंदिरामागे गोदावरी नदी, मौजे चनकवाडी, मौजे पाटेगाव.
तहसील कार्यालय फुलंब्री : पाल फाटा- किनगाव फाटा
तहसील कार्यालय वैजापूर : पुरणगाव, सावखेडगाव, नागमठाण, झालेगाव, लाखणी, लासूरगाव
तहसील कार्यालय गंगापूर : जामगाव, वाहेगाव, आसेगाव, लिंबेजळगाव टोल नाका
तहसील कार्यालय कन्नड : नेवपूर, देवळी
तहसील कार्यालय खुलताबाद : खुलताबाद- फुलंब्री रोडवरील काटशेवरी फाटा, धुळे-सोलापूर हायवेवरील वेरुळ या ठिकाणी
तहसील कार्यालय सिल्लोड : भराडी पेट्रोलपंप नाका सिल्लोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संभाजीनगर नाका सिल्लोड, भोकरदन फाटा, कोटनांद्रा बोरगाव बाजार, पिरोळा फाटा, सिसारखेडा भराडी, पंप धानोरा फाटा, वांजोळा फाटा, केऱ्हाळा फाटा, निल्लोड फाटा, भवन व चिंचखेडा, बनकिन्होळा, कायगाव, तांडा, बाजार, गव्हाली तांडा, बोरगाव, कासारी, डोंगरगाव, मंगरुळ अन्वी, १२ नंबर फाटा पालोद, गोळेगाव बुद्रूक शिवना, अंजिठा, अंभई हट्टी उंडणगाव
तहसील कार्यालय पैठण : वाळूघाट हिरडपुरी
जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व वेळोवेळी पोलीस विभागाच्या मदतीने नेमून दिलेल्या ठिकाणी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कारवाईचा अहवाल दररोज जिल्हाधिकारी कार्यालयात मागविण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात १ एप्रिल २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत एकूण २०८ अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणांमध्ये महसूल प्रशासनाने कारवाई करून ३ कोटी ९१ लाख ८२ हजार रुपये दंड आकारला आहे. २ कोटी ४१ लाख १६ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवायांमध्ये २७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच १९९ वाहने व ४ यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे.