फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : आजोबानं कमालच केली. नातवाच्या वाढदिवशी काहीतरी विशेष असं करायचं असं त्यांनी ठरवलं अन् त्यांना कल्पना सूचली की, अख्ख्या शाळेला छावा चित्रपट दाखवावा. या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी लगेच पाऊलही उचलले अन् शाळेतील ग्रामीण भागातील मुलांना ३ वेगवेगळ्या बसमध्ये छत्रपती संभाजीनगरला आणून अंबा-अप्सरा या मल्टिप्लेक्समध्ये छावा चित्रपट दाखवला. आजोबा आहेत फुलंब्री तालुक्यातील खामगावचे. श्री गोरक्ष बहुउद्देशीय संस्थेच्या शाळेतील पाचवी ते सातवीच्या मुलांना त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली.
छत्रपती संभाजीनगर महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट अजूनही प्रचंड गर्दी खेचत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. एकूण २६८ मुलांना छावा चित्रपट आजोबांनी दाखला. खामगाव येथून गोरक्ष विद्यामंदिरातून तीन बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. आजोबा मोहन पाटील सोनवणे हे श्री गोरक्ष बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्षही आहेत. त्यांचा नातू व अभिलाष मोहन पाटील सोनवणे यांचा सुपूत्र धर्मराजचा दुसरा वाढदिवस होता. चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी भावुक होऊन छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही होते. ग्रामीण भागात थिएटर नसल्याने मुलांना चित्रपट पहायचा म्हटलं की टीव्हीशिवाय गत्यंतर नाही. मात्र शहरात मल्टिप्लेक्समध्ये छावा पाहण्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.

तनवाणी शाळेनेही ३३९ विद्यार्थ्यांना दाखवला ‘छावा’
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बजाजनगरातील तनवाणी शाळेनेही ३३९ विद्यार्थ्यांना ‘छावा’ चित्रपट दाखवला. तनवाणी शाळेच्या संचालक निशा तनवाणी यांनी यासाठी पुढाकार घेतला. इतिहास बालमनावर कोरला जावा आणि मुलांनी आपल्या पराक्रमी पूर्वजांबद्दल अभिमान बाळगावा, यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. इतर शाळांनीही याचा आदर्श घ्यावा, असे त्या म्हणाल्या. विशेष उपक्रमात खिवंसरा थिएटर, बजाजनगर यांनीही मोलाची साथ दिली. थिएटर व्यवस्थापक फिलिप्स वायदंडे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी चिप्स, पॉपकॉर्न आणि थंड पेय मोफत देण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा म्हणून आम्ही हा छोटासा हातभार लावला, असे वायदंडे यांनी सांगितले.