छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रोझोन मॉलमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावणारी घटना समोर आली आहे. चोरट्याने मॉलमधून चक्क महागडा कॅमेरा चोरून नेला आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षारक्षक आणि सेल्समनची फळी असतानाही टाटा क्रोमा सेंटरमधून चोरट्याने ७० हजारांचा कॅमेरा लांबवलाच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मॉलसमोरून दुचाकी चोरून नेल्याची दुसरी घटनाही समोर आली आहे. दोन्ही घटनांच्या तक्रारी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (११ जुलै) टाटा क्रोमा या इलेक्ट्रॉनिक्स शोरूमचे डिपार्टमेंट मॅनेजर सुमित ईश्वरलाल बावसीवाल (वय ३५, रा. गुरुदत्तनगर, विजय चौकजवळ, गारखेडा परिसर) यांनी तक्रार दिली, की ते टाटा क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर प्रोझोन मॉलमध्ये सुमारे १४ वर्षांपासून डिपार्टमेंट मॅनेजर आहेत. मुख्य व्यवस्थापक समीर धीवरे आहेत. ८ जुलैला रात्री ९ च्या सुमारास सेल्समन सोहेल याने नेहमीप्रमाणे डेमो टेबलची पाहणी केली असता त्यास एक निकॉन कंपनीचा ७० हजार रुपयांचा कॅमेरा कमी असल्याचे दिसले. त्याने इतर सेल्समनला विचारले असता हा कॅमेरा आज रोजी विक्री न झाल्याचे त्याला समजले.
त्याने ही माहिती बावसीवाल व समीर धीवरे यांना कळविली. त्यावरून रात्री स्टोअरमधील CCTV कॅमेरे चेक केले असता त्यात दिसले की एक अनोळखी ३५ वर्षीय व्यक्ती दुपारी सव्वातीनच्या सुमारास खरेदीसाठी आला. त्याने मोबाईल व इतर वस्तू बघितल्या व कॅमेरा सेक्शनजवळ येऊन कॅमेरे बघितले. टेबलजवळ कोणी सेल्समन नसल्याचे पाहून व सर्व सेल्समन इतर कामात असल्याचे पाहून निकॉन कंपनीचा कॅमेरा चोरून त्याचे पँटमध्ये टाकला व सेल्समनला न सांगता काऊंटरवर बील न देता दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी निघून गेला. या प्रकरणात क्रोमा शोरूमकडून बावसीवाल यांनी दोन दिवसांनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश तांबोरे करत आहेत.
मॉलजवळून दुचाकीची चोरी…
सेवानिवृत्त बँक कर्मचारी रमेश अर्जुनराव सातपुते (वय ६३, रा. रविदर्शन गोकुळनगरी सातारा परिसर) यांची दुचाकी हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल (MH 20 AM 2545) प्रोझोन मॉलच्या बाजूच्या रोडवरून चोरीला गेली आहे. या घटनेची तक्रार तब्बल महिनाभराने त्यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात १० जुलैला दिली आहे. १२ जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी प्रोझोन मॉलच्या बाजूला रोडवर मोटारसायकल उभी केली होती. एन. जे. इन्व्हेस्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेले व काम झाल्यावर सकाळी साडेअकराच्या सुमारास परतले. मात्र त्यांना मोटारसायकल दिसली नाही. महिनाभर शोध घेऊनही मोटारसायकल न मिळाल्याने अखेर त्यांनी १५ हजार रुपयांची मोटारसायकल चोरीची तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश तांबोरे करत आहेत.