वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हसोबा चौक शाखेतून ग्राहकाची १ लाख ४० हजार रुपयांची बॅग दोन लहान मुलांनी लांबवल्याची घटना समोर आल्याने वैजापूरमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (११ जुलै) दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला आहे.
जीवनगंगा सोसायटीतील जीम ट्रेनर तथा बॅग मॅन्युफॅक्चरर विजय त्रिभुवन यांनी या प्रकरणात तक्रार दिली. यांनी गुरुवारी बंधन बँकेतून १ लाख ४० हजार रुपये काढले व त्यात आणखी २० हजार रुपये टाकून ही रक्कम भरण्यासाठी म्हसोबा चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आले. बचत खात्यात २० हजार रुपये जमा करत असतानाच लहान मुलाने त्यांची १ लाख ४० हजार रुपये रक्कम व आधार कार्ड, लायसन्स, मतदान कार्ड, बँकेचे पासबुक, चेकबुक व एटीएम कार्ड असलेली बॅग घेऊन पळ काढला. लहान मुलगा बँकेबाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार श्री. झाल्टे करीत आहेत.