वाळूज महानगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराणा प्रताप चौकातील गजबजलेल्या रस्त्यावर पार्क करून ठेवलेली कार अचानक रिव्हर्स येत १५०० फूट अंतर पार करत एका मेडिकलमध्ये घुसली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मेडिकल काऊंटरचे मोठे नुकसान झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी कार (क्र . एमएच २० जीक्यू ७०६८) रस्त्याच्या बाजूला पार्क केली आणि लॉक करून पत्नीसह हॉस्पिटलमध्ये गेले. काही वेळाने कार आपोआप रिव्हर्स जात रस्ता ओलांडून १५०० फुटांवर असलेल्या मेडिकलमध्ये घुसली. उन्हाचा कडाका असल्याने रस्त्यावर आणि मेडिकलमध्ये गर्दी नव्हती. कार इतक्या वेगात आली की, ३ फुटांच्या पायऱ्या चढून मेडिकलच्या काउंटरला धडकली. दरम्यान, कारचालकाला घटना समजली तेव्हा तोही आश्चर्य व्यक्त करत होता. या घटनेबद्दल चालकाने कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा केला आहे. ही घटना गजबजलेल्या ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. कार कंपनीचे अभियंते कारची पाहणी करणार असल्याचे चालकाने सांगितले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
