पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव कारने दुचाकीस्वार दत्तात्रय बाबुराव चोरमारे (३५, रा. थेरगाव, ता. पैठण) याला चिरडले. तो पाचोडहून पैठणला जात होता. ही दुर्घटना गुरुवारी (११ जुलै) रात्री दहाच्या सुमारास पाचोड- पैठण रस्त्यावर लिंबगावजवळ (ता. पैठण) घडली.
दत्तात्रय दिवसभराचे काम उरकून पाचोडहून दुचाकीने (एमएच २० इटी ३८१४) गावी येत होता. त्याचे गाव अडीच किलोमीटरवर राहिले असताना मागून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. एमएच २३, बीएच ३२०३) त्याला धडक दिली. दत्तात्रय चेंडूसारखा उंच उडून गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला. पाचोडकडून पैठणला माजी आमदार संजय वाघचौरे जात असताना त्यांनी तातडीने थांबून दत्तात्रयला बेशुद्धावस्थेत पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश साबळे यांनी प्रथमोपचार करून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात हलवले. घाटीतील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. दत्तात्रयच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, आई, वडील व पत्नी असा परिवार आहे. कारच्या समोरील भागाचा पूर्णतः चुराडा झाला आहे.