छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी येथील एका शेतकऱ्याची सून छत्रपती संभाजीनगरला जलसंधारण अधिकारी झाली आहे. शेती व घरकाम करून सौ. प्रियांका संतोष सुलाने यांनी हे यश मिळवले आहे, हे उल्लेखनीय. त्यामुळे अवघ्या गावात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
सौ. प्रियांका सुलाने यांनी जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातून पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले. नंतर औरंगाबाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इंजिनिअरिंग केले. त्यांचे लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत होत्या. मात्र लग्न झाल्याने आपले स्वप्न पूर्ण होईल की नाही याची चिंता त्यांना होती. मात्र लग्नानंतर सासरच्यांनी त्यांना मुलीप्रमाणे वागवले. त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनीही या संधीचे सोने केले. मात्र सून म्हणून जबाबदाऱ्याही योग्यरित्या पार पाडल्या. शेती कामासह घरकामे करून त्यांनी अभ्यासाकडेही पुरेपूर लक्ष दिले. स्पर्धा परीक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाले.
त्यांची नियुक्ती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वैजापूर येथील पाटबंधारे विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी झाली होती. आता त्या छत्रपती संभाजीनगरला जलसंधारण अधिकारी झाल्या आहेत. इतर मुली आणि महिलांपुढे सौ. प्रियांका सुलाने यांनी आदर्श ठेवला आहे. यशाबद्दल सौ. प्रियांका सुलाने म्हणाल्या, की ध्येय गाठायचे असेल तर इच्छाशक्ती आणि मेहनत गरजेची असते. मनात जिद्द असेल तर कोणतेही अडथळे आपोआप दूर होतात. मला कुटुंबाचा पाठिंबा लाभल्याने मी भाग्यवान ठरले. माझे यश एकटीचे नसून, यात कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. माझ्या आई-वडिलांनी कधी मुलगा-मुलगी असा फरक केला नाही. लग्नानंतर सासू-सासऱ्यांनीही सून न समजता स्वतः च्या मुलीप्रमाणे वागणूक दिली. यशात माझ्या पतीची साथ खूप महत्त्वाची ठरली, असे त्या म्हणाल्या.