पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : ट्रॅक्टरने मोटारसायकलला उडवले. यात सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (१२ जुलै) दुपारी एकच्या सुमारास पाचोड ते विहामांडवा रोडवरील चौंढाळा गावाजवळ घडली. आर्यक्य नितीन चव्हाण (वय ६, रा. खंडाळा, ता. पैठण) मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव असून, त्याचे वडील नितीन रहिमान चव्हाण (वय ३०) गंभीर जखमी झाले आहेत.
चिमुकल्याला सोबत घेऊन नितीन चव्हाण हे कामानिमित्ताने विहामांडवा येथे गेले होते. दुपारी विहामांडवा येथून गावाकडे परतत असताना केकत जळगाव येथून विहामांडव्याकडे येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली. यात बापलेक जखमी झाले. दोघांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी आर्यक्यला तपासून मृत घोषित केले. नितीन यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाचोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघाताला कारणीभूत ट्रॅक्टरचालकाला अटक करण्यासाठी महिलांनी ग्रामीण रुग्णालयासमोर आक्रमक पवित्रा घेतला होता. तोपर्यंत बालकाचा मृतदेत ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अर्धनग्न होत टाहो फोडला.