छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ४८ वर्षीय औषध विक्रेता विजय नारायण पटेल (रा. बजाजनगर) यांनी स्वतःच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (११ जुलै) सायंकाळी रांजणगाव शेणपुंजीत समोर आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
विजय पटेल हे तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथील असून, सध्या रांजणगाव शेणपुंजीत पत्नी, मुलगा व मुलीसह राहतात. गुरुवारी ते दुकानात होते. सायंकाळी मेडिकल स्टोअर्सचे शटर अर्धवट लावलेले दिसल्याने शेजारीच मोबाइल शॉपीचे दुकान असणारे त्यांचे चुलत भाऊ अंबालाल पटेल यांनी आत डोकावले. त्यांना विजय यांनी सिलिंग फॅनला बेडशीटच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसले.
त्यांनी आरडाओरड केली असता लगतचे व्यावसायिक धावून आले. त्यांनी विजय यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी येत पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर शुक्रवारी विजय यांच्यावर तुर्काबाद खराडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून, अधिक तपास पोलीस अंमलदार सुरेश तारव करत आहेत.