छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हौदात पडून तीन वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (१२ जुलै) दुपारी १२ च्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील कमळापूरमध्ये घडली. रुद्र धनराज वाघ असे या चिमुकल्याचे नाव आहे.
धनराज मंचक वाघ (रा. आजेगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली) हे कमळापूरच्या सिध्देश्वर व्हॅलीत काही दिवसांपूर्वी पत्नी कृष्णाली वाघ, मुलगा रुद्र (३) व स्वराज (१) यांच्यासह राहायला आले. शुक्रवारी सकाळी धनराज कामानिमित्त घराबाहेर पडले होते तर त्यांची पत्नी कृष्णाली व मुले रुद्र व स्वराज घरीच होते. सकाळी अकराला रुद्र घराबाहेर खेळत होता. कृष्णाली या घरकामात व्यस्त होत्या. काही वेळाने कृष्णाली यांनी पाहिले असता रुद्र दिसला नाही. त्यांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र सर्वत्र शोध घेऊनही तो दिसत नसल्याने कृष्णाली घाबरून गेल्या.
वसाहतीतील महिला व नागरिकांच्या मदतीने रुद्रचा शोध घेतला जात असताना या भागातील नागरिक राठोड यांनी वाघ यांच्या घराजवळील बागूल यांच्या घराचे नवीन बांधकाम सुरू असलेल्या हौदात डोकावून पाहिले. त्यांना रुद्र हौदात पडलेला दिसला. ते पाहताच कृष्णाली यांनी हंबरडा फोडला. वसाहतीतील नागरिकांनी रुद्रला बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून रुद्रला मृत घोषित केले. या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून, अधिक तपास केला जात आहे.