छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : लग्नसराई सुरू आहे. अवतीभवती अनेक लग्न होत आहेत. त्यात ही आणखी ‘एका लग्नाची गोष्ट’…पण जराशी वेगळी! छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहात राहणाऱ्या अनाथ पुजाचे आज, ७ मार्चला अण्णासाहेब सातपुते या युवकाशी लग्न झाले. शासनाच्या अनाथाश्रमातली ही कन्या सातपुतेंच्या घरची सून झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः या मुलीचे पालक म्हणून कन्यादान केले. एरवी रुक्ष भासणाऱ्या प्रशासनाची ही एक संवेदनशील किनार, कन्या पाठवणी करताना पापण्यांच्या कडाही ओलावून गेली…

शासनाच्या सावित्रीबाई महिला राज्यगृहातली कन्या चि. सौ. कां. पूजा आणि सुंदरराव जनार्दन सातपुते यांचा सुपूत्र चि. अण्णासाहेब यांचा शुभविवाह सिडको एन-४ मधील गोपीनाथ मुंडे भवनात मंगलाष्टकांच्या अभिवचनांच्या वर्षावात आशीर्वादरुपी अक्षदांचे शिंपण होऊन पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या विवाहप्रसंगी कन्यादान केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती करुणा स्वामी या सुद्धा या सोहळ्यात सहभागी झाल्या. कन्यादानाच्या सर्व विधीत त्या सहभागी होत्या. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे आणि राज्यगृहाच्या अधीक्षक अपर्णा सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त श्रीमती हर्षा देशमुख यांनी विवाहाच्या सर्व तयारीत मोलाची भूमिका बजावली. या विवाह सोहळ्यासाठी राजेंद्र झंवर, कांचन साठे, रश्मी कुमारी, कविता वाघ यांनी सहकार्य केले.

काळजीपूर्वक निवड आणि प्रक्रिया
विवाहासाठी अण्णासाहेब सातपुते यांच्या आई- वडिलांनी राज्यगृहात संपर्क केला होता. त्यानुसार वर- वधू पसंती झाली. वर अण्णासाहेब हे जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रात व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत आहेत, तर वधू पूजा ही १० वी उत्तीर्ण असून तिने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. एकंदर सगळी माहिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, मानसिकता, जबाबदारीची जाण लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. वर- वधूंची आपापसात भेट, हितगुज झाली. दोघांची एकमेकांना पसंती आहे. हे लक्षात घेतल्यानंतरच स्थानिक व्यवस्थापन समिती ज्यात अशासकीय सदस्यही असतात हे सगळे जण वराच्या घरी गेले. सर्व परिस्थिती पाहून मगच या विवाहाला संमती दिली. त्यानंतर विभागीय समितीने सगळी परिस्थिती पाहून या विवाहास मान्यता दिली. आधी सोमवारी (३ मार्च) नोंदणी विवाह करण्यात आला. विवाहास पारंपरिक संस्काराचे स्वरुप मिळावे म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील गोपीनाथ मुंडे मंगल कार्यालयात विधीवत समारंभ पार पडला.

पुनर्वसनाचे यशस्वी उदाहरण
पूजा ही एक अनाथ मुलगी. पैठण येथील बालगृहात तिचे बालपण गेले. तेथेच तिचे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या १८ व्या वर्षांनंतर ती महिला बालविकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई राज्यगृहात आली. येथे महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवले जातात. पूजाने येथे फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून, ती आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या मार्गावर आहे. ‘मला आता हक्काचे कुटुंब मिळाले आहे. या क्षणी मी अतिशय आनंदी आहे,’ अशी भावना पूजाने व्यक्त केली.
पहा व्हिडीओ :
समाजासाठी संदेश
हा विवाह केवळ दोन जीवांचे मिलन नव्हते, तर तो समाजासाठी एक सकारात्मक संदेश होता. अनाथ मुलींना पुनर्वसनाच्या माध्यमातून एक नवीन जीवन मिळू शकते, हे या विवाहाने अधोरेखित केले. प्रशासनाच्या संवेदनशीलतेने आणि सामंजस्यपूर्ण प्रयत्नांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. हा विवाह दोन जीवांचे मिलन तर होताच त्यासोबतच अनाथाश्रमात लहानाची मोठी झालेल्या पूजाला हक्काचं घर मिळवून देणाराही ठरला.
समाजाची जबाबदारी
अनाथ मुलींना सक्षम आणि सुरक्षित आयुष्य देण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे, तर समाजानेही पुढाकार घ्यायला हवा. पूजाच्या विवाहाने दाखवून दिले की योग्य प्रयत्न आणि संवेदनशील दृष्टीकोन असेल, तर अनाथ मुलींनाही आपले हक्काचे घर आणि कुटुंब मिळू शकते. हा विवाह सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रशासनाच्या या अनोख्या उपक्रमामुळे अनेक अनाथ मुलींच्या भविष्यासाठी नवी दिशा मिळू शकते. भविष्यात अशा उपक्रमांना आणखी व्यापक स्वरूप मिळावे, अशीच समाजाची अपेक्षा आहे.