छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात सन २०२०-२१, सन २०२२ व जून २०२३ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सर्व संबंधित उमेदवारांना जात वैधता प्रमाण पत्र सादर करण्यासाठी दिलेली मुदत ९ जुलैला संपली असून, त्यांनी वैधता प्रमाणपत्र १९ जुलैपर्यंत सादर करावे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात सन २०२०-२१ सन २०२२ व जून २०२३ पर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमनिहाय पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणूकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी त्या त्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याकडे शासन अध्यादेशानुसार दिलेल्या बारा महिन्यांच्या मुदत वाढीच्या कालावधीत जात वैधता समितीकडून प्राप्त झालेल्या जात वैधता प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत १९जुलै २०२४ रोजीपर्यंत न चुकता सादर करावी. संबंधितांनी जात वैधता प्रमाणपत्राची प्रत सादर न केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१ अ, कलम ३०-१ अ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी कळविले आहे.