बंगळुरू (सीएससीएन न्यूजडेस्क) : कन्नड अभिनेत्री रान्या रावला मंगळवारी (४ मार्च) सोन्याच्या तस्करी प्रकरणात बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. अटकेनंतर आता रान्या रावने एक धक्कादायक दावा केला आहे. चौकशीदरम्यान, तिने पोलिसांना सांगितले की तिला सोन्याची तस्करी करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आले होते.

रान्या रावला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला. यात पोलिसांनी २.६७ कोटी रुपयांची रोकड आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. छाप्यादरम्यान, पोलिसांनी तिच्या घरातून तीन मोठे बॉक्स देखील जप्त केले, त्यानंतर जप्तीची एकूण किंमत १७.२९ कोटी रुपये झाली. रान्या राव बेंगळुरूमधील केआयए विमानतळावर (केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ) उतरताच, तिने पोलीस कॉन्स्टेबल बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणीला बायपास करण्याचा प्रयत्न केला. पण डीआरआय (रेव्हेन्यू इंटेलिजेंस डायरेक्टरेट) तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. गेल्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला गेली आणि त्यामुळे ती डीआरआयच्या रडारवर आली होती. तिच्या जॅकेटमधून १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने जप्त केले. तिने तिच्या जॅकेटमध्ये सोन्याचे बार लपवले होते. सोने जप्त केल्यानंतर रान्याला अटक करण्यात आली आणि पुढील चौकशीसाठी नागावरा येथील डीआरआय कार्यालयात नेण्यात आले.
रान्याचे वडील डीजीपी
रान्या रावच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्या रावला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. डीआरआयचे अधिकारी आता तपास करत आहेत की रान्या राव एकटीच सोन्याची तस्करी करत होती की ती मोठ्या सोन्याच्या तस्करी नेटवर्कचा भाग होती.
