छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पती वेगवेगळ्या मुलींशी व्हॉट्स अॅप चॅटिंग करत होता. पत्नीने त्याचा मोबाईल चेक केला असता ही बाब तिच्या लक्षात आली अन् तिला धक्काच बसला. त्यावर पतीने माझा मोबाईल का घेतला, असे म्हणत तिला शिवीगाळ करून तू याबाबत कोणास काही सांगितले तर जीवे मारून टाकेल, अशी धमकी दिली. त्यानंतर तिला त्रास देऊन घराबाहेर हाकलून दिले. २४ वर्षीय विवाहितेने सिडको पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या ८ जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी (११ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार विवाहित तरुणीचे सासर सांगळेवाडी सारा वैभवमागे जटवाडा रोड हर्सूल येथे असून, ती सध्या माहेरी एन ११ हडको सुभाषचंद्र बोसनगरात राहते. तिचे लग्न २६ फेब्रुवारी २०१९ रोजी झाले. सासरच्या लोकांनी तिला लग्न झाल्यानंतर ४ ते ५ महिनेच चांगले वागवले. त्यानंतर घरगुती कारणावरून सर्वांनी शिवीगाळ करून मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. तिचा पती मोबाईल फोनवर वेगवेगळ्या मुलींशी व्हॉट्स ॲप चॅटिंग करत असताना तिला दिसले. तिने त्याचा मोबाईल चेक केला तेव्हा त्याने माझा मोबाईल का घेतला असे म्हणून विवाहितेला शिवीगाळ केली. १ ऑगस्ट २०१९ रोजी तिला घरातून हाकलून दिले.
त्यानंतर १५ दिवसांनी विवाहितेचे आई, वडील व नातेवाईकांनी बैठक घेतली. त्यावेळी तिच्या पतीने सांगितले, की यानंतर असे वागणार नाही. त्यामुळे विवाहिता पुन्हा नांदायला गेली. २७ डिसेंबर २०१९ रोजी तिला मुलगा झाला. त्यानंतर पुन्हा सासरच्यांनी छळ सुरू केला. तुझ्या वडिलांकडून कार घेण्यासाठी ७ लाख रुपये, अशी मागणी करून तिला त्रास देऊ लागले. तिला मारहाण करत घराबाहेर काढून दिले. लहान मुलासह ती आई-वडिलांच्या घरी राहायला आली. त्यानंतर त्यांनी नांदवायला नकार दिला. अखेर विवाहितेने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिचा पती, सासू, तिन्ही नणंदा व तिन्ही नंदोई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार देविदास राठोड करत आहेत.