छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून हे घर आम्ही तुझ्या पतीकडून विकत घेतलेय असे म्हणत तिला घराबाहेर काढून तिचे सामान रस्त्यावर फेकले. ती विरोध करत असल्याने तिच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगावमध्ये गुरुवारी (११ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास घडली. महिलेने घाबरून तिथून पळ काढल्याने वाचली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी अमजद रज्जाक नावाच्या व्यक्तीसह त्याच्यासोबत आलेल्या ३ अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शाहिस्ता मोईन शेख (वय ३२, रा. पठाण मोहल्ला, अंबड जि. जालना ह. मु. नारेगाव, छत्रपती संभाजीनगर) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिचा पती मोईन शेख चांद हा अंबड येथे राहतो. ती दीड वर्षापासून त्याच्यापासून वेगळे नारेगावमध्ये राहत आहे. तिची मुले तिच्या पतीसोबत राहतात. मोईन शेखने २००६ साली नारेगावच्या १३ नंबर गल्लीत प्लॉट घेऊन घर बांधले आहे. तिथे ती आधी पती, मुलांसह राहत होती. १० वर्षे ते त्या घरात राहिले. त्यानंतर पती व शाहिस्तामध्ये वाद झाल्याने काही दिवस अंबडला ते राहिले. नंतर शाहिस्ता नारेगावमध्ये येऊन घरात राहत आहे.
गुरुवारी दुपारी शाहिस्ता नारेगावमध्ये घरी असताना अमजद रज्जाक हा तीन अनोळखी महिलांना घेऊन आला. सर्व जण घरात घुसले. आम्ही मोईन शेख याच्याकडून घर विकत घेतले आहे. तू घरातून सामान बाहेर घेऊन जा. अन्यथा तुझे सामान घराबाहेर फेकून देऊ, असे ते म्हणाले. त्यावर शाहिस्ताने त्यांना सुनावले, की मी येथे राहणार आहे, मी कुठेही जाणार नाही… त्यानंतर त्यांनी शाहिस्ताचे सामान घराबाहेर फेकायला सुरुवात केली. त्यांना शाहिस्ता विरोध करत असल्याने त्यांनी सोबत आणलेल्या प्लास्टीक बॉटलमधील डिझेल शाहिस्ताच्या अंगावर टाकले. त्यामुळे घाबरून शाहिस्ताने तिथून पळ काढला. त्यानंतर ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. पोलिसांनी तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे करत आहेत.