सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीत बुडून सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील भाविकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (१० जुलै) दुपारी २ वाजता घडली. प्रभाकर उबाळे (वय ४२) असे मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी ते गेले होते.
मंगळवारी (९ जुलै) अंधारी येथून उबाळे हे पंढरपूरला गेले होते. बुधवारी दुपारी चंद्रभागा नदीत मित्रांसोबत अंघोळीसाठी उतरले. मात्र ते बुडाले. अन्य भाविकांनी नदीत उड्या मारून त्यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाही. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सायंकाळी सहाला मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश मिळवले.
मृतदेह अंधारी येथे आणल्यानंतर गुरुवारी सकाळी उबाळे वस्तीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उबाळे हे घरातील कर्ता पुरुष होते. त्यांना वडिलोपार्जित एक एकर जमीन आहे. त्यांच्या वडिलांचे १८ वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. लहान भाऊ गणेशचेही निधन झालेले आहे. प्रभाकर यांच्यावरच पूर्ण घराची जबाबदारी होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.