कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : दिघी (ता. कन्नड) येथील लाडका बब्या बैल अचानक दगावला अन् अवघे गाव हळहळले. बब्बा काही असातसा नव्हता, त्याचा स्वतःचा मोठा लौकीक होता. मराठवाड्यासह खानदेशातील अनेक शंकरपटांमध्ये त्याने बाजी मारून मालक शेतकऱ्याला बक्षीस मिळवून दिले. २७ फेब्रुवारीला तो गेला अन् मालकाला धक्काच बसला. त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले असून, दहावा घालून ग्रामस्थांना जेवण देणार असल्याची माहिती त्याचे मालक शेतकरी भूषण चांदा यांनी दिली.
दिघी येथील प्रगतिशील शेतकरी भूषण भाऊसिंग चांदा यांचा हा बब्या बैल होता. १२ ठिकाणी झालेल्या शंकरपटांत त्याने यश मिळवले होते. त्यामुळे तो केवळ पंचक्रोशीतच नव्हे तर सबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या परिचयात होता. दूरदूरपर्यंत त्याची ख्याती होती. अनेक शेतकरी तर त्याला खास बघायचे म्हणून दिघीला यायचे. ग्रामस्थांना तर त्याचे खूप कौतुक होते. त्याच्यामुळे आपल्या गावाचे नाव मराठवाडा, खानदेशात प्रदेशात गाजल्याने सारेच बब्याचा हेवा करायचे. २७ फेब्रुवारीला तो सर्वांना सोडून गेल्याने अवघे गाव हळहळले. शेतकरी चांदा यांच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिघीत येत बब्याचे अंतिमदर्शन घेतले. चांदा कुटुंबीयांनी घरातील सदस्याप्रमाणे बब्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले.