छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथील स्मशानभूमीत चक्क मंगलाष्टकांचे सूर घुमल्याने सारेच आश्चर्यचकीत झाले. स्मशानभूमी तशी आक्रोशाशिवाय दुसरं काही अनुभवत नाही, पण रविवारी (२ मार्च) ती मंगलमय वातावरणाने भारलेली होती.
स्मशानभूमीतील कर्मचारी दत्ता कोंडेवार यांची ज्येष्ठ कन्या पूजा हिचा विवाह प्रसाद शेळके (नेवासा) यांच्यासोबत स्मशानभूमीत पार पडला अन् या अनोख्या विवाहाचे अनेकजण साक्षीदार झाले. स्मशानभूमी सजावट, मंडप व रोषणाईने नटली होती. विविध राजकीय पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या अनोख्या सोहळ्याला हजेरी लावली. स्मशानातच भोजन तयार करण्यात आले. लग्नसोहळा पार पडल्यानंतर नवरा-नवरीला शुभेच्छा देत वऱ्हाडी मंडळीने तिथे पंगतीत भोजन केले.