छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरात उद्या, १३ जुलैला दाखल होत आहे. सकाळी ११ पासून सिडको चौक ते क्रांती चौकादरम्यान निघणाऱ्या महारॅलीच्या पार्श्वभूमीवर उद्या शहरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. तसे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढले आहेत. कंपन्यांनाही सुटी देण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली होती. मात्र औद्योगिक आस्थापनांना सुटी देण्यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नसल्याचे कामगार उपायुक्त कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजला सांगितले.
हायलाइट्स…
हे रस्ते बंद असणार : केंब्रिज चौक, मुकुंदवाडी येथील एसटी वर्कशॉप, एपीआय कॉर्नर, सिडको चौकातील कामगार चौक व जळगाव रोडकडे जाणारे मार्ग, हायकोर्ट चौक, कॅनॉटकडून रामगिरीकडे येणारा मार्ग, एअर इंडियाचे कार्यालय, मनियार दुकानाजवळील चौक (एमजीएम), गजानन महाराज मंदिरापासून जालना रोडच्या दिशेने चौक बंद केला जाईल, अॅपेक्स रुग्णालय मार्ग, त्रिमूर्ती चौक, लक्ष्मण चावडी, अजबनगर, बंजारा कॉलनी, सिल्लेखाना, उस्मानपुरा चौक, काल्डा कॉर्नर, जिल्हा न्यायालय चौक, रमानगर, महावीर चौक बॅरिकेड्स लावून बंद केले जातील.
हे पर्यायी मार्ग…
केंब्रिज चौक-झाल्टा फाटा ते बीड बायपासमार्गे महानुभाव आश्रम चौक या मार्गे जातील व येतील.
केंब्रिज चौक ते सावंगी बायपास-हर्सूल टी-हडको कॉर्नर- अण्णा भाऊ साठे चौक-सिटी क्लब-मिलकॉर्नर-महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) या मार्गाने वाहने जातील व येतील.
नगर नाका-लोखंडी पूल-पंचवटी, रेल्वेस्थानकमार्गे महानुभाव चौक मार्गे जातील व येतील.
कोकणवाडी चौक-पंचवटी चौक- महावीर चौक मार्गे पुढे जातील व येतील.
अशी आहे पार्किंगची सुविधा…
-जालना, करमाडकडून येणाऱ्या वाहनांसाठी : रामनगर कमानीसमोर ग्रॅमफोर्थसमोरील पार्किंग.
-पाचोड, आडोळकडून येणाऱ्या वाहनांसाठी जबिंदा मैदान
-बिडकीन, पैठणकडून येणाऱ्या वाहनांसाठी अयोध्या मैदान
-सिल्लोड, फुलंब्रीकडून येणाऱ्या वाहनांसाठी : शरद टी सिग्नलजवळील खुले मैदान, आंबेडकर चौक पिसादेवी रोडवरील राममंदिर ट्रस्ट मैदान, मिलिनियम पार्क मैदान
-कन्नड, वैजापूर, नगर रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी आयकर भवनजवळील फुटबॉल मैदान, कर्णपुरा पार्किंग
सकाळी ९ पासूनच जालना रोड बंद…
पहिल्यांदाच शहराची मुख्य वाहिनी समजला जाणारा १४.८ किमीचा जालना रोड केंब्रिज चौक ते नगर नाकापर्यंत सकाळी ९ पासून बंद राहणार आहे. रॅली संपेपर्यंत तो बंदच राहील. क्रांती चौकाला जोडणारा कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना चौक या मार्गावर देखील सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी केले आहे. रॅली पुढे जाईल तसे चौक वाहतुकीसाठी खुले केले जातील. वाहतूक नियोजनासाठी २६५ पोलिस अधिकारी, अंमलदार तैनात असणार आहेत. १०० होमगार्ड व गरज पडल्यास राखीव ५० पोलिस रस्त्यावर उतरवले जातील.
-रॅली मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी (बाटल्या), खिचडी, पिठलं-भाकरी, वांग्याचे भरीत आणि भाकरी, पुरीभाजीची व्यवस्था केली आहे.
-रॅली मार्गावर शासकीय दूध डेअरी चौकात १० जेसीबींतून जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात येणार आहे.
-शनिवारच्या रॅलीच्या अग्रभागी मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग असेल. ११ कुमारी मुलींकडून जरांगे पाटील यांचे औक्षण केले जाणार आहे.
-जरांगे यांचे भाषण सर्वांना ऐकता यावे यासाठी क्रांती चौकापासून पैठण गेटपर्यंत आणि क्रांती चौकापासून गोपाल टीपर्यंत आणि जुने हायकोर्ट तसेच शासकीय दूध डेअरी चौकापर्यंत रस्त्यांवर एलईडी आणि लाऊडस्पीकर लावले जाणार.
असा असेल बंदोबस्त..
४ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, ९० पोलीस अधिकाऱ्यांसह ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. बाहेरूनदेखील वाहतूक पोलीस व बंदोबस्तासाठी पोलिसांची कुवक मागविण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांनी वाहनांच्या पार्किंगसाठी काही जागांची चाचपणी केली. अयोध्या मैदान, कर्णपुरा, कडा कार्यालय, जाधववाडी, गरवारे मैदान, बीड बायपासवरील जबिंदा मैदान या मैदानांची त्यांनी पाहणी केली.
पोलिसांनी केल्या या सूचना…
रॅलीत सहभागी होणाऱ्या महिला, पुरुषांनी मौल्यवान वस्तू, दागिने बाळगू नयेत. मोबाइल काळजीपूर्वक वापरावा. झेंड्यांना स्टील पाइप नसावेत. ते कमी उंचीचे असावेत. कुणी हवेत फिरवू नये. नशेखोर सापडल्यास कायदा हातात घेऊ नये, अशा सूचना पोलीस विभागाकडून करण्यात आल्या. दामिनी पथकांसह महिला पोलिसांचे विशेष पथकही रॅलीत नियुक्त असणार आहे.