छत्रपती संभाजीनगर/ कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि दोघा अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या ४ वेगवेगळ्या घटनांत ३ तरुण व एका वासनांध म्हाताऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
घटना पहिली : कन्नडच्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार
कन्नड : कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १६ वर्षीय शाळकरी मुलीवर लग्नाचे अमिष दाखवून तरुणाने वर्षभर अनेकदा बलात्कार केला. यातून ती ४ महिन्यांची गर्भवती झाली आहे. कन्नड ग्रामीण पोलिसांनी लखन बळीराम राठोड (वय २१ रा. उपळा, ता. कन्नड) याला अटक केल आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी गुरुवारी (११ जुलै) या प्रकरणात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी लखनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लखन आणि पीडित मुलगी शेजारी शेजारी राहत असल्याने त्यांच्यात ओळख झाली. लखनने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून वर्षभरात तिच्यासोबत वारंवार जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर लखनने ९ जुलैला तिला पळवून नेले.
९ जुलैला मुलीच्या वडिलांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात केली. कन्नड ग्रामीण पोलिसांनी दोघांचा शोध घेतला असता छत्रपती संभाजीनगर येथील वाळूजमध्ये दोघे खोली करून राहत होते. तिथून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लखनविरुद्ध मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार दिली. मुलगी सध्या चार महिन्यांची गर्भवती आहे. लखनविरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, कैलास निभोरकर करत आहेत.
घटना दुसरी : ती अल्पवयीन असल्यापासून दोघांत शरीरसंबंध, नंतर लग्नाला नकार, पुंडलिकनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल…
छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन असल्यापासून त्याने प्रेमाचे नाटक करत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता ती २१ वर्षांची आहे, तर तो २५ वर्षांचा. मात्र आता तो बदलला असून, त्याने तिला लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अजय भालसिंगे पाटील (रा. पाचोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघांत ती अल्पवयीन असल्यापासून प्रेमसंबंध अाहेत. २०२१ मध्ये दोघांत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले.
तो बीड बायपासवरील हॉटेल नंदिनीमध्ये तिला नेऊन तिच्यासोबत ती अल्पवयीन असल्यापासून शारीरिक संबंध ठेवत होता. मात्र काही दिवसांपासून त्याने तिला टाळायला सुरुवात केली. लग्नाचा तगादा सुरू केल्यावर अजयने तिला थेट नकार दिला. तुला केस करायची तर कर, काय करायचे ते करून घे, असा मेसेज करून धमकावले. त्यामुळे तरुणीने पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठले. तिच्यावर बलात्काराचे सत्र सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२४ या कालावधीत घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक राजेश यादव अधिक तपास करत आहेत.
घटना तिसरी : घरात घुसून अल्पवयीन मुलीला मिठी मारण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : घरात घुसून अल्पवयीन मुलीला मिठी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आकाश रावसाहेब निकाळजे (२५, रा. ब्रिजवाडी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता ब्रीजवाडी परिसरात घडली. मुलगी काकाच्या घरी आली होती. ती भांडी घासत असताना आकाशने तिला प्लेट मागितली. ती प्लेट आणण्यासाठी घरात जाताच आकाश तिच्या मागून घरात गेला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला.
घटना चौथी : तोंड दाबून पडक्या घरातील बाथरूममध्ये नेत बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न, वाळूजची घटना
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीत येथे घरासमोर गल्लीत आठ वर्षीय चिमुकली सायकलवर खेळत होती. श्रीमंत गायके (वय ५२, रा. त्रिमूर्तीनगर, रांजणगाव शेणपुंजी) या नराधमाने तिचे तोंड दाबून तिला पडक्या घरातील बाथरूममध्ये नेत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण, बाजूला राहत असलेली सतर्क महिला व चिमुकलीच्या आईमुळे सुदैवाने चिमुकली वाचली. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (९ जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर नराधम पसार झाला आहे.
आठ वर्षीय चिमुकली आई- वडिलांसोबत वाळूजला राहते. तिचे वडील कंपनीत कामाला जातात, तर आई पिठाची गिरणी चालवते. चिमुकलीला मोठी बहीणही आहे. मंगळवारी दोघीच घरी होत्या. सायंकाळी चिमुकली सायकल घेऊन परिसरात खेळत होती. तिला पकडून तिचे तोंड दाबून श्रीमंत गायके याने शेजारील पडक्या घरातील बाथरूममध्ये नेले. हा प्रकार शेजारील महिलेने पाहिले. तिथे तातडीने मुलीच्या आईकडे धाव घेत त्यांना सांगितले. चिमुकलीची आई व शेजारील महिलेने पडक्या घराकडे धाव घेतली. चिमुकलीचे नाव घेत आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळत नव्हता. पडक्या घरात जाताच दोघींना श्रीमंत गायके हा चिमुकलीसोबत अश्लील चाळे करताना दिसला. नराधमाच्या ताब्यातून मुलीला सोडविण्यासाठी दोघींनी झटापट केली.
या प्रकारात श्रीमंत गायकेने दोघींना मारण्यास सुरुवात केली. आरडाओरडा केल्यानंतर मारहाणीच्या भीतीने नराधम गायके घटनास्थळावरून संधी साधून पळून गेला घटनास्थळी मोठा जमाव जमला. मुलीला आई-वडिलांनी विश्वासात घेत चौकशी केली. मुलीने सांगितले, की ती सायकल खेळत असताना श्रीमंत गायके याने तिला बोलावले होते. पडक्या घरातील बाथरूममध्ये तिला तोंड दाबून नेत अश्लील चाळे सुरू केले. आईला काही सांगू नकोस, अन्यथा तुला मारेन, अशी धमकीही तिला दिल्याचे चिमुकलीने सांगितले. आई- वडिलांनी चिमुकलीसह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी श्रीमंत गायकेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहेत.