वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाशिकच्या मालेगाव येथील सटाणा रस्त्यावरील इंडसलँड बँकेचे अख्खे एटीएम मशिनच उचलून चोरटे स्कॉर्पिओमधून नेत होते. वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात ते आले असता पोलिसांची गस्तीवरील जीप येत असल्याचे पाहून त्यांनी स्कॉर्पिओ या भागातील एका शेतवस्तीवर नेली. तिथे शेतकऱ्यांनी चोर चोर म्हणून आरडाओरड केली. त्यामुळे १५-२० शेतकरी जमा झाले. त्यांना पाहून चोरट्यांची पळापळ झाली. त्यांनी स्कॉर्पिओ तिथेच सोडून पळ काढला. त्यातील दोन चोरट्यांना शेतकऱ्यांनी पाठलाग करून पकडलेच. पैशांनी भरलेले एटीएम शेतकऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केले. ही थरारक घटना गुरुवारी (११ जुलै) पहाटे घडली.

विष्णू रामभाऊ आकात (वय २९, रा. सातोना, ता. परतूर, जि. जालना), देवा सुभाष तावडे (वय २०, रा. पुंडलिकनगर, छत्रपती संभाजीनगर), आकाश गाडगे (रा. पाचोड, ता. पैठण) व सराईत चोरटा लक्ष्मण गाडे अशी चोरट्यांची नावे आहेत. त्यांनी मालेगाव येथून इंडसलँड बँकेचे एटीएम मशीन चोरले. ते जशास तसे काढून स्कॉर्पिओ जीपमध्ये (एमएच २० सीएफ ४७२७) टाकले. त्यानंतर वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात आले.
भरधाव जात असताना त्यांना अचानक रस्त्यावरून पोलिसांची रात्री गस्तीवर असलेली जीप दिसली. त्यामुळे चोरट्यांनी भीतीने आपली जीप या भागातील एका शेतवस्तीवर नेली. ही बाब शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी चोर चोर म्हणून आरडाओरड केली. त्यामुळे या भागातील इतर १५ ते २० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी आल्याचे पाहून चोरटे घाबरून गेले.
स्कॉर्पिओ तिथेच सोडून त्यांनी पळ काढला. त्यांच्यामागे शेतकरी लागले. चोरटा विष्णू आकात याने शिवारातील एका विहिरीत उडी मारली. ग्रामस्थांनी त्याला विहिरीबाहेर काढले. दुसरा चोरटा देवा तावडे यालाही पकडले. त्यांचे साथीदार आकाश गाडगे व सराईत चोरटा लक्ष्मण गाडे मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. ही माहिती शेतकऱ्यांनी शिऊर पोलिसांना दिली होती. हा सर्व थरार घडत असतानाच पोलीसही आले. दोन्ही चोरट्यांना त्यांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी एटीएम मशिन ताब्यात घेतले असून, ते चोरट्यांनी फोडलेले नव्हते. त्यामुळे त्यातील रकमेची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आज, १२ जुलैला इंडसलँड बँकेचे अधिकारी येणार असून, त्यांच्यासमोर एटीएम मशिन उघडले जाणार आहे.