छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : बुलडाण्याच्या १७ वर्षे १० महिने वय व बीएस्सी फर्स्ट इयरला असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी बसथांब्यावरून टाटा नेक्सन कारमधून कुख्यात गुन्हेगाराने पळवले होते. तिला अकोल्याला आणत असताना डाबकी रोड पोलिसांनी अकोला शहरातील एसबीआय बँकेसमोर नाकेबंदी केली. गुन्हेगाराच्या कारचा सिनेस्टाइल पाठलाग करून कारसमोर पोलीस व्हॅन आडवी लावली. कार पोलीस व्हॅनला धडकली. पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून मुलीची सुटका केली आहे.
अपहृत मुलीचे वडील खासगी नोकरी करतात. बुलडाणा शहरातील सम्राट अशोकनगरात मलकापूर रोड येथे हे कुटुंब राहते. पत्नीला स्कीन ॲलर्जीचा त्रास असल्याने २१ फेब्रुवारीला ते पत्नी व मुलीसह छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरातील गोगलानी हॉस्पिटलमध्ये दाखविण्यासाठी आले होते. त्यांचे एक नातेवाइक त्यांना भेटण्यासाठी येणार असल्याने मुकुंदवाडीतील बौध्दविहाराजवळील मुकुंदवाडी बसथांब्यावर दुपारी साडेतीनला हे कुटुंब थांबले. त्याचवेळी प्रियांका (नाव बदलले आहे) आईला म्हणाली, की मम्मी मला बाथरूमला जायचे आहे. इथे कुठे असेल तर मी जाऊन येते, असे सांगून गेली.
थोड्यात वेळात प्रियांका ही एमएच २७, बीक्यू ९३३७ या क्रमांकाच्या टाटा नेक्सन कारमध्ये ओळखीचा मुलगा अमित सुनील बेंडवाल (वय २२, रा. शहर पोलीस ठाण्यामागे, बुलडाणा) याच्यासोबत मुकुंदवाडी बसथांब्यावरून जाताना वडिलांना दिसली. त्यांना आवाज देऊन वडिलांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. पण ते थांबले नाहीत. सुसाट निघून गेले. अमित हा अट्टल गुन्हेगार आहे. मुलगी घरी गेली असेल असे समजून आई-वडील बुलडाण्याला परतले. मात्र मुलगी घरीही आलेली नव्हती. त्यानंतर तिचे वडील पुन्हा २३ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरला आले. त्यांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी अमित बेंडवालविरुद्ध गुन्हा दाखल केला व मुलीचा शोध सुरू केला. मुलीने अमितसोबत जाताना गुलाबी टी शर्ट, काळी पँट घातलेली होती. सोबत ४५ हजार रुपये रोख असलेली पर्स होती. मुकुंदवाडी पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना अपहरणाची माहिती पाठवून दिली. त्यामुळे बुलडाणा, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अलर्ट झाले.
अकोला पोलिसांची सिनेस्टाइल कामगिरी…
२६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त अकोला पोलीस दल बंदोबस्तात होते. डाबकी रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक संजय पहुरकर यांचे पथक गस्तीवर असताना त्यांना डायल ११२ वर कॉल आला, की निंबा- अकोला रोडवर एमएच २८ बीक्यू ९३३७ नंबर असलेल्या कारमध्ये मुलीचे अपहरण करून एक गुन्हेगार घेऊन जात आहे. पहूरकर हे तातडीने लोकेशनच्या ठिकाणी डाबकी बसथांब्यावर आले असता अमितची कार त्यांना भरधाव जाताना दिसली. पहूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच कारचा पाठलाग सुरू केला. त्याला गाडीचा हॉर्न देऊन थांबण्याचा इशारा करत होते. महाशिवरात्री उत्सव असल्याने रस्त्याने भाविकांची गर्दी डाबकी रोडने होती. अमित या गर्दीचा फायदा उचलून थांबत नव्हता. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही संयमाने घेतले. पोलिसांनी आपली गाडी वेगाने पुढे नेऊन त्याच्या कारच्या बरोबरीने घेत थांबण्याचा इशारा केला. पण त्याने वेग अधिकच वाढवला.
पहूरकर यांनी पोलीस ठाण्यात कॉल करून आणखी एका टीमला एसबीआय बँकेसमोर नाकेबंदी करायला सांगितली. पोलिसांच्या दुसऱ्या टीमने काही मिनिटांत एसबीआय बँकेसमोर नाकेबंदी केली. अमितने नाकेबंदी पाहूनही वेग कमी न करता एसबीआय बँकेसमोर एका मोटारसायकलला धडक दिली. त्यामुळे कुठला अनर्थ होऊ नये म्हणून पोलिसांनी आपले वाहन त्याच्या कारसमोर सिनेस्टाइल आडवे लावले व तातडीने पोलीस वाहनातून उतरले. त्याने पोलिसांच्या वाहनाला उडवले. यात पोलिसांच्या शासकीय वाहनाचे (एमएच ३०, बीबी ३५९४) मोठे नुकसान झाले. नंतर त्याची कार बंद पडली. तातडीने पोलिसांनी अमितला कारबाहेर काढून ताब्यात घेतले. मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन तिची सुटका करण्यात आली. कारवाईची माहिती मुलीच्या पालकांना देण्यात आली. त्यानंतर ते अकोला येथे आले. त्यांच्या ताब्यात मुलीला देण्यात आले. अमितला अटक केल्याची माहिती डाबकी रोड पोलिसांनी मुकुंदवाडी पोलिसांना दिली. तातडीने मुकुंदवाडी पोलिसांचे पथक अकोल्याला गेले आणि अमितला ताब्यात घेतले.