छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वीज महावितरण कंपनीचा कन्नडचा कार्यकारी अभियंता धनाजी रघुनाथ रामुगडे व उपव्यवस्थापक प्रवीण कचरू दिवेकर (रा. पडेगाव) या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना बुधवारी (१० जुलै) लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
रोहित्राच्या चार कामांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून १ लाख रुपयांची लाच त्यांनी घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रामुगडेच्या दालनातच सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात वरात काढली. यापूर्वी दोघांनी ठेकेदाराकडून दीड लाख रुपये घेतले होते. मात्र, तरीही या लावखोरांची हाव संपली नव्हती…
दोघांनी ठेकेदाराकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केली होती. दीड लाख मिळाल्यानंतर दोन कामांचे प्रस्ताव त्यांनी मंजुरीसाठी पाठवले. उर्वरित दोन कामांसाठी पुन्हा दोन लाखांची मागणी केली. ठेकेदाराने दोघांना धडा शिकवण्याचा निर्णय घेत मंगळवारी थेट एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने लाचेच्या मागणी आणि यापूर्वी लाच घेतल्याची खात्री केली व सापळा रचला.
मंगळवारी उशिरा तडजोडीअंती रामुगडे १ लाखावर तयार झाला. ठेकेदाराला त्याने दालनातच पैसे घेऊन यायला सांगितले. बुधवारी दुपारी पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या पथकाने सापळा रचून दालनात घुसून दोघांच्या मुसक्या आवळल्या. रामुगडेला दीड तर दिवेकरला १ लाख रुपये पगार आहे, हे विशेष. दोघांना अटक केल्यानंतर लगेचच दिवेकरच्या पडेगावच्या घराची झडती घेण्यात आली. दिवेकरच्या घरी ठाणे येथील एसीबी पथकाने छापा टाकला.