छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सीए पती-पत्नी ऑफिसमध्ये गेल्यानंतर चोरट्यांनी घर फोडून ७० हजार रुपयांसह ७ तोळे सोने असा एकूण सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी (९ जुलै) दुपारी बन्सीलालनगरात घडली. वेदांतनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कर सल्लागार किशोर मदनलाल राठी (५६, रा. श्रेयस अपार्टमेंट) यांनी पोलिसांत चोरीची तक्रार नोंदवली. उस्मानपुऱ्यात राठी यांचे कार्यालय आहे. त्यांची पत्नीही सीए आहे. राठी पती-पत्नी ९ जुलैला रोजी सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले. त्यांच्या पत्नीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेजाऱ्यांनी कॉल केला व सांगितले, की तुमच्या घरात कुणीतरी शिरले आहे. त्यानंतर किशोर राठी तातडीने घरी आले. त्या वेळी घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.
घरात सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. राठी यांनी तातडीने वेदांतनगर पोलीस ठाण्यात कॉल करून माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून घराची पाहणी केली. चोरट्यांनी ७० हजार रुपये रोख, ४७.५०० ग्रॅमचे मंगळसूत्र, २३.६९० ग्रॅमची साखळी, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ४.३१० ग्रॅमची अंगठी, ६ ग्रॅमची सोन्याची लेडीज अंगठी, फॅसिल कंपनीचे १० हजारांचे घड्याळ असा एकूण ६ लाख १४ हजार ७२१ रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले. तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे करीत आहेत.
पन्नालालनगरमध्ये डॉक्टरचे घर फोडले…
पर्यटनासाठी बाहेरगावी गेलेल्या डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही चोरी २८ मे ते २८ जून दरम्यान घडली. ९ जुलैला डॉ. अंजली राजपूत (वय ४४, रा. पन्नालालनगर) यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. राजपूत पर्यटनासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. एक महिना फिरून आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांना दिसले.
१ लाख ५५ हजार ४९० रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे एक नाणे, सुमारे १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे ५० ग्रॅमचे षटकोनी आकाराचे एक नाणे असा एकूण तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद आबुज करीत आहेत.
बजाजनगरात घरासमोरून कार नेली…
बजाजनगरातील श्रीराम हाऊसिंग ग्रुपमध्ये राहणाऱ्या श्रीकांत माळी यांची कार घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी (१० जुलै) सकाळी समोर आली. माळी यांची कार (क्र. एमएच २० ईई ६७९४) अंगणात उभी केली होती. बुधवारी सकाळी कार दिसत नसल्याने माळी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका राखाडी (ग्रे) रंगाच्या विना क्रमांक स्विफ्ट कारमध्ये आलेल्या चोरट्यांपैकी एकजण खाली उतरला. त्याने चावीने माळी यांच्या कारचा दरवाजा उघडला. अवघ्या ५ मिनिटांमध्ये चोरटे कार घेऊन पसार झाले. पुढे मोहटादेवी मंदिर चौक, जागृत हनुमान मंदिर चौक आदी ठिकाणच्या कॅमेऱ्यात चोरटे कार घेऊन जाताना दिसतात. याप्रकरणी माळी यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.