प्रशिक्षण घेतलेल्या १८० पैकी ३६ महिलांचे उद्योग उभारणीसाठी पहिले पाऊल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : हिमरु शाल निर्मिती हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे वैशिष्ट आहे. हिमरु शाल आजही पसंत केली जाते. त्यामुळे हिमरु शाल निर्मितीला खूप वाव आहे.नुकतेच हिमरु शाल निर्मितीचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रोत्साहन, अर्थसहाय्यासाठी मदत व मार्गदर्शन देऊन या उद्योगाला गत वैभव प्राप्त करुन देऊ,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रामार्फत हिमरु शाल निर्मितीचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची बैठक आज नियोजन सभागृहात पार पडली. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, एमसीईडीचे थावरे आदी यावेळी उपस्थित होते.
माहिती देण्यात आली की, हिमरु शाल निर्मितीचे (हातमागावर) प्रशिक्षण १८० महिलांना देण्यात आले आहे. यापैकी ३६ महिलांनी हिमरु शाल निर्मिती उद्योग टाकण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रस्ताव सादर केला आहे. हे सर्व प्रस्ताव बॅंकांकडे अग्रेषित करण्यात आले आहेत. ७ महिलांचे उद्योग सुरु झाले आहेत. बॅंकांमधून ही प्रकरणे मार्गी लागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक केदार यांनी प्रत्येक प्रकरण निहाय आढावा घेतला.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांनी उद्योग उभारणीसाठी पुढे यावे. त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे महत्त्वाचे उत्पादन म्हणून हिमरु शाल निर्मितीला चालना देऊन त्याचे गतवैभव आपण पुन्हा मिळवू. त्यासाठी सगळ्यांनी संयुक्त प्रयत्न करावे. मार्केटींग, ब्रॅण्डींग, लेबलिंग, पॅकेजिंग याबाबत त्यांना संधी व मार्गदर्शन देऊन उत्पादित मालाच्या विक्रीची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.